वंशिका चाचे : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये विविध आकार आणि विविध स्वरूपाच्या गणेशमूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्ती बाजारपेठेत उपलब्ध असताना भक्तांनी कागदाचा लगदा आणि मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तींना पसंती दिली आहे. वजनाने हलक्या आणि किंमत कमी असल्याने या मूर्तींना मागणी वाढल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा होणार यात काही शंका नाही.
सजावटीच्या आणि ‘धोतर-फेटा’ गणेशमूर्तींना यंदा मोठी मागणी आहे. बाजारपेठेत यंदा पारंपरिक मूर्तींपेक्षा धोतर, फेटा परिधान केलेल्या आणि आकर्षक सजावट तसेच ज्वेलरी वर्क असलेल्या मूर्तींना भक्तांकडून विशेष पसंती मिळत आहे. चौरंगावर विराजमान झालेल्या धोतर-फेट्यातील मूर्ती पहिल्या काही दिवसांतच बुक झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूळचे पेणचे असलेले मूर्तिकार प्रभाकर म्हात्रे यांच्या कापूरबावडी ढोकाळी नाका येथील कारखान्यात ९० टक्के मूर्ती शाडू मातीच्या आहेत. याशिवाय, यंदा पहिल्यांदाच त्यांनी कागदाच्या लगद्यापासून (३५-४० टक्के पेपर लगदा व ६० टक्के शाडू माती) बनवलेल्या मूर्तींनाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या मूर्ती शाडूच्या मातीसारख्याच सुबक; परंतु वजनाने अत्यंत हलक्या असल्याने पुढील वर्षासाठी एक ते दीड फुटांच्या लहान कागदी मूर्तींची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्थानिक गृहसंकुले (सोसायट्या) आणि सार्वजनिक मंडळे आपल्याच परिसरात किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करीत असल्याने मातीच्या मूर्तींना पसंती मिळत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
जुन्याच दरात विक्री
बाजारपेठेत यंदा २० ते २५ टक्क्यांपर्यंत दरवाढ झालेली आहे; मात्र आमचा स्वतःचा कारखाना आहे. तसेच गणेशमूर्तींसाठी लागणारा कच्चा माल त्यांना थेट पेण येथून उपलब्ध होत असल्याने त्यांनी दरात कोणतीही वाढ केलेली नाही. यंदा पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी वाढली असून पीओपीच्या मूर्तींची मागणी आता १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली गेल्याचे मूर्तिकार प्रभाकर म्हात्रे यांनी सांगितले.
स्वामी समर्थांपासून कोळी गणेशापर्यंत अनोखी क्रेझ
यंदाच्या गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तींमध्ये आकर्षक आणि हटके रूपांचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. स्वामी समर्थांच्या रूपातील गणराय, गरुडावर विराजमान गणपती, बालकृष्णाचे रूप, मूषकसंघ, शंखावरील गणपती आणि कोळी वेशभूषेतील मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर नंदीवरील गणराय, शेंदूरलाल गणपती, डायमंड वर्कमधील चमचमती मूर्ती आणि पारंपरिक धोती-फेट्यातील गणपतींनाही मोठी मागणी आहे.
यंदाचे गणेशमूर्तींचे दर
• आठ इंच मूर्ती : १,२००
• दहा इंच मूर्ती : १,५००
• एक फूट मूर्ती : २,५००
• १.२५ ते १.५ फूट मूर्ती : ३,००० ते ३,३००
• २१ इंच मूर्ती : ५,०००
• दोन फूट मूर्ती : ६,०००
(विशेष सजावट आणि ज्वेलरीसाठी १,००० ते २,००० अतिरिक्त शुल्क)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.