६१.५५ कोटींचा सेवा रस्त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत फेटाळला
अपोलो हॉस्पिटल चौकात उड्डाणपूलच होणार ः सागर नाईक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ ः नवी मुंबई पालिका मुख्यालय ते बेलापूर येथील एअर इंडिया कॉलनीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ६१ कोटी ५५ लाखांच्या सेवा रस्त्याच्या प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळण्यात आला आहे. केवळ मर्यादित भागासाठी सेवा रस्ता बनविण्याऐवजी अपोलो रुग्णालय चौकातील गंभीर कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली. त्यानंतर सभापती अशोक पाटील यांनी हा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर केला.
पालिकेने आम्र मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने मुख्यालय ते एअर इंडिया कॉलनीदरम्यान ईपीसी मोडवर समांतर सेवा रस्ता बनवण्याचा प्रस्ताव आणला होता. बैठकीत चर्चेदरम्यान लोकप्रतिनिधींनी या ६१.५५ कोटींच्या खर्चावर आणि प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले सभागृह नेते सागर यांनी बोलताना सांगितले, की गुगल मॅपवर अपोलो रुग्णालयाचा सिग्नल कायम लाल (कोंडी) दिसतो. या सेवा रस्त्याचा फायदा केवळ नेरूळच्या एका बाजूला वळण्यासाठी होईल. त्याऐवजी अपोलो सिग्नलवर उड्डाणपूल बांधल्यास नेरूळ, उरण फाटा आणि जेएनपीएकडे जाणारी अवजड वाहतूक थेट आणि अडथळामुक्त होईल. पालिकेच्या निधीचा हाच योग्य वापर ठरेल. हा सेवा रस्ता पुढे जाऊन पुन्हा निमुळता होणार आहे. आमच्या प्रभागातील इन्कम टॅक्स कॉलनी, एकता विहार, निलगिरी सोसायटी आणि अपोलो रुग्णालयामधील रुग्णांना रस्ता ओलांडणे कठीण जाते. तिथे दुभाजक किंवा गतिरोधकही दिले जात नाहीत. त्यामुळे ६१ कोटींचा हा रस्ता बनवण्यापेक्षा तिथे उड्डाणपूल होणे गरजेचे आहे, असे नगरसेविका सरोज पाटील यांनी सांगितले. केवळ पूल बनवायचा म्हणून बनवू नये. पूर्वीच्या अनेक पुलांमुळे ठाणे-बेलापूर रस्त्यासारखे मार्ग तोडावे लागले आहेत. कन्सल्टंटचे एस्टिमेट चुकतात, त्यामुळे पालिकेने डिझाईन अँड बिल्ट पद्धत आणली पाहिजे. विमानतळ सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर लहान वाहनांची प्रचंड गर्दी होईल, त्यामुळे संपूर्ण मार्गाचा सर्वसमावेशक विचार करूनच निर्णय घ्यावा, असे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर सोनवणे यांनी सांगितले. या प्रकल्पापूर्वी योग्य व्हेईकल डेन्सिटी स्टडी (वाहतूक घनता अभ्यास) करायला हवी होती. ५४ ते ६१ कोटी रुपये खर्च करून जर मुख्य वाहतूक कोंडी सुटणार नसेल, तर या प्रस्तावाचा फेरविचार व्हायलाच हवा, असे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार यांनी सांगितले.
प्रशासनाची बाजू व मेट्रो मार्ग
प्रकल्पाचे समर्थन करताना शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी स्पष्ट केले, की आम्र मार्गावरून दररोज सुमारे २० हजार अवजड वाहने जेएनपीएकडे जातात. सायंकाळच्या वेळी किल्ले गावठण व आंबेमाता मंदिर सिग्नलवर ५०० ते ६०० मीटरच्या रांगा लागतात. ती कोंडी फोडण्यासाठी आणि कॅरेज-वे वाढवण्यासाठी हा सेवा रस्ता प्रस्तावित केला होता. तसेच, सिडकोच्या प्रस्तावित मेट्रो मार्गाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, की मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मेट्रो मार्ग मानखुर्द, वाशी, जुईनगर, नेरूळ एलपी, नेरूळ स्थानक आणि अपोलो सिग्नलच्या पुढून सागर संगम स्थानकामार्गे विमानतळाकडे जाणार आहे.
स्थायी समितीचा अंतिम निर्णय
लोकप्रतिनिधींचा विरोध आणि अपोलो चौकातील उड्डाणपुलाची गरज लक्षात घेऊन सभापती अशोक पाटील यांनी बेलापूर मुख्यालय ते एअर इंडिया कॉलनी सेवा रस्त्याचा प्रस्ताव नामंजूर केला. संपूर्ण परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून अपोलो चौकात उड्डाणपूल उभारण्याचा नवा व सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.