पनवेल-खांदा कॉलनी जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला मंजुरी
पावसाळ्यातील पाणी साचण्याचा प्रश्न सुटणार; भुयारी मार्गातून पादचारी मार्ग उभारण्याचीही सूचना
पनवेल, ता. ९ (बातमीदार) : पालिका हद्दीतील पनवेल आणि खांदा कॉलनी या दोन महत्त्वाच्या वसाहतींना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जे. जे. वूड ते भुयारी मार्ग (सीकेटी कॉलेज कॉर्नर, खांदा कॉलनी) या मार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण महासभेत मंजुरी देण्यात आली.
पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी (ता. ९) विशेष सर्वसाधारण महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महासभेत संबंधित रस्त्याच्या काँक्रीटीकरण विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर या कामाला सभागृहाची मंजुरी मिळाली. पनवेल आणि खांदा कॉलनी या दोन वसाहतींना जोडणारा हा रस्ता दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावर रेल्वे पूल भुयारी मार्गाच्या स्वरूपात असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
पादचारी मार्ग मोकळा
रस्त्याच्या काँक्रीटीकरणासोबतच भुयारी मार्गातून स्वतंत्र पादचारी मार्ग उभारण्यात यावा, अशी सूचना सभागृहनेते प्रकाश बिनेदार यांनी महासभेत केली. यामुळे विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळणार आहे. खांदेश्वर परिसरात मोठ्या संख्येने शाळा व महाविद्यालये असल्याने या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ये-जा करतात. या कामाला मंजुरी मिळाल्याने पनवेल-खांदा कॉलनीदरम्यानचा वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा अधिक सुरक्षित व सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.