सभागृह नेते सागर नाईकांनी रोखले क्रीडा संकुल
वाशीतील ४५ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीत नामंजूर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : वाशीमध्ये प्रस्तावित ४५ कोटी ४८ लाखांच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समिती सभेत नामंजूर केला आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर बहुमताने हा प्रस्ताव रद्द करण्यात आला, तर नगरसेविका सरोज पाटील आणि नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला.
स्थायी समितीच्या विषयपत्रिकेनुसार, वाशी सेक्टर-१० ‘ए’मधील २० हजार ४०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर आरसीसी जी+२ स्वरूपाचे क्रीडा संकुल उभारणे नियोजित होते. यामध्ये १०० मीटर रनिंग ट्रॅक, टेनिस कोर्ट, हॉकी मैदान, बॅडमिंटन व बास्केटबॉलसाठी मल्टिस्पोर्टस हॉल, स्विमिंग पूल आणि इनडोअर गेम्स अशा विविध अत्याधुनिक सुविधांचा समावेश होता. या कामासाठी शेठ कन्स्ट्रक्शन कंपनीची ४५ कोटी ४८ लाख ७८ हजार १५४ रुपयांची निविदा अंतिम मंजुरीसाठी समितीसमोर ठेवली होती. सभेत चर्चेदरम्यान सागर नाईक यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. परिमंडळ-१मध्ये (नेरूळ व वाशी) आधीपासूनच स्विमिंग पूल व इनडोअर स्पोर्टसच्या सुविधा उपलब्ध आहेत. याउलट ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे व रबाळे या परिमंडळ-२ मधील क्षेत्रांमध्ये महापालिकेच्या पुरेशा क्रीडा सुविधा नाहीत. महापालिकेकडे अमर्याद निधी उपलब्ध नसल्याने निधीचे समान वाटप आणि प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचे आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले. शहर अभियंते शिरीष आरदवाड यांनी निधीच्या उपलब्धतेबाबत आणि तांत्रिक बाबींवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो अभ्यास करूनच हा प्रस्ताव आणला असून, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि नव्या पिढीसाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. हा विषय नामंजूर न करता स्थगित ठेवावा, अशीही भूमिका त्यांनी घेतली. तरीही नाईक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या निर्णयाला नगरसेविका सरोज पाटील आणि नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी विरोध केला. अखेर सभागृह नेत्यांच्या सूचनेनुसार सभापतींनी हात वर करून मतदान घेतले. बहुसंख्येने प्रस्ताव नामंजूर करण्याच्या बाजूने कौल दिल्याने वाशीतील या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला.
बेलापूर आणि ऐरोली वाद
आतापर्यंत बेलापूर मतदारसंघात विविध प्रकारची क्रीडा संकुले आणि क्रीडाविषयक प्रकल्प राबवले आहेत. मात्र, ऐरोली मतदारसंघात असे का केले जात नाही, असा प्रश्न सागर नाईक यांनी उपस्थित केला. ऐरोलीमध्येदेखील टप्याटप्प्याने विकास केला जाणार आहे, असे सांगितल्यानंतरही हा प्रकल्प रद्द केल्याने बेलापूर विरुद्ध ऐरोली वाद रंगल्याची चर्चा सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.