नवी मुंबई विमानतळ परिसरात
दिशादर्शक फलकाचा विसर!
अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा प्रशासनावर संताप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू यांसारख्या अतिभव्य प्रकल्पांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी मुंबईहून अटल सेतूमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाताना महामार्गावर एकही मार्गदर्शक फलक (साइन बोर्ड) नसल्याचे पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘प्रशासनाकडे पैसे नसतील तर माझ्या स्वखर्चाने रस्त्यावर विमानतळाचा बोर्ड लावून देते,’ असा टोलाही त्यांनी सिडको आणि महामार्ग विकास प्राधिकरणाला लगावला. याबाबत प्रशासनाशी संपर्क हाेऊ शकला नाही.
गुप्ते यांना नवी मुंबई विमानतळाहून कोल्हापूरला जायचे होते. त्याकरिता त्यांनी मुंबईहून अटल सेतूमार्गे नवी मुंबई विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी जेएनपीए मार्गाचा वापर केला. यावर विमानतळाचे फलक लावले नसल्याने गुप्ते यांचा संताप अनावर झाला. अटल सेतूवरून नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करताना विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर कुठेही स्पष्ट दिशादर्शक किंवा नामफलक लावलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना आणि प्रवाशांना विमानतळाची वळणे शोधताना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुप्ते यांनी याच गंभीर समस्येवर थेट बोट ठेवले. ‘जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून महामार्ग बांधल्याचा आव आणणारे प्रशासन साधे दिशादर्शक फलक लावायला विसरतेच कसे? हे अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे,’ अशा शब्दांत त्यांनी रोष व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराचा विकास, जोडरस्ते आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची मुख्य जबाबदारी ‘सिडको’ आणि संबंधित रस्ते विकास प्राधिकरणावर आहे. मात्र केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या या अधिकाऱ्यांना महामार्गावरील प्राथमिक सोयीसुविधांचे भान उरलेले नाही, हेच या घटनेवरून स्पष्ट होते.
----
आता तरी डोळे उघडणार का?
एका ज्येष्ठ कलाकाराला प्रशासकीय नाकर्तेपणावर बोट ठेवत ‘स्वखर्चाने बोर्ड लावून देते’ असे उपरोधिकपणे म्हणावे लागणे, ही सिडको आणि रस्ते विभागासाठी अत्यंत नामुष्कीची बाब आहे. सामान्य नागरिकांच्या खिशातील कराचा पैसा कुठे जातो, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वंदना गुप्ते यांच्या या टोल्यानंतर तरी सुस्त बसलेले सिडकोचे अधिकारी जागे होणार की खरोखरच एखाद्या नागरिकाकडून स्पॉन्सरशिप मिळण्याची वाट पाहणार, असा जळजळीत सवाल जनता विचारत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.