सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ढोल-ताशांचा गजर, आरास आणि गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाली असताना ठाणे महापालिकेच्या कारभाराने मात्र गणेश मंडळांसमोरच विघ्न उभे केले आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी दाखल झालेल्या २८२ अर्जांपैकी केवळ ८० अर्जांना मंजुरी मिळाली असून, तब्बल २०२ मंडळे अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे गणरायाच्या आगमनाची तयारी करण्याऐवजी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.
पालिकेकडे ८ सप्टेंबरपर्यंत १४५ ऑनलाइन आणि १३७ प्रत्यक्ष असे एकूण २८२ अर्ज दाखल झाले आहेत, मात्र यापैकी अवघ्या ८० अर्जांवर निर्णय झाला आहे. म्हणजेच बहुसंख्य मंडळांची परवानगी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. उत्सवाचे दिवस जवळ येत असताना प्रशासनाच्या या संथ कारभारामुळे मंडळांच्या नियोजनाचा खोळंबा झाला आहे. प्रभागनिहाय आकडेवारी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. इतर अनेक भागांतील मंडळांना मंजुरीसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. दिव्यात तब्बल १५ अर्ज प्रलंबित असल्याने तेथील मंडळांसमोर परवानगीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, मंडपाची परवानगी ही केवळ कागदी प्रक्रिया नसून त्यानंतर वाहतूक, अग्निसुरक्षा, विद्युत व्यवस्था आणि अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करावी लागते. मंडप उभारणीपासून सजावट आणि सुरक्षिततेपर्यंतची संपूर्ण तयारी करण्यासाठी मंडळांना वेळ लागतो, मात्र पालिकेच्या दिरंगाईमुळे हा सगळा वेळ परवानगी मिळविण्याच्या प्रतीक्षेतच जात असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवाच्या तारखा आधीपासून निश्चित असताना पालिका प्रशासनाने परवानगी प्रक्रिया वेळेत पूर्ण का केली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. गणरायाच्या आगमनाची तारीख प्रशासनाला माहीत असताना २०२ अर्ज प्रलंबित कसे राहिले, परवानगी देण्याची प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत लांबवून मंडळांची कोंडी करण्याचा प्रकार तर नाही ना, अशी संतप्त चर्चा मंडळांमध्ये सुरू आहे.
२०२ अर्जांवर कारवाईचा प्रतीक्षा
एकीकडे महापालिका उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी विविध बैठका आणि नियोजनाचा दावा करते. दुसरीकडे मंडप परवानग्यांच्या फाइली मात्र रखडलेल्या आहेत. प्रशासनाच्या या कासवगतीमुळे उत्सवाच्या नियोजनातच ‘विघ्न’ निर्माण झाले आहे. आता उरलेल्या २०२ अर्जांवर तातडीने निर्णय घेऊन मंडळांना परवानग्या देणार का, की गणेशोत्सव सुरू झाल्यानंतरही मंडळांना पालिकेच्या दालनांचे उंबरठे झिजवावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रभाग समिती अर्ज मंजुरी
वर्तकनगर ३८ ३३
माजिवडा-मानपाडा ५५ ४२
लोकमान्यनगर-सावरकरनगर ३६ १३
उथळसर ३८ १७
नौपाडा-कोपरी ३१ ११
वागळे इस्टेट ३१ १५
कळवा २३ ७
मुंब्रा ९ ३
दिवा १७ २
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.