मुंबई

सीएसएमटीवर पुनर्विकासाचा ‘ब्लॉक’

CD

सीएसएमटीवर पुनर्विकासाचा ‘ब्लॉक’
१४-१५ प्लॅटफॉर्मही ताब्यात देण्याची मागणी; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे परिचालन विस्कळित होण्याची भीती
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासामुळे आता लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ गेल्या सात महिन्यांपासून बंद असतानाच, आता १४ आणि १५ क्रमांकाचे प्लॅटफॉर्मही ताब्यात देण्याची मागणी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) केली आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म बंद झाल्यास सीएसएमटीवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या परिचालनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्लॅटफॉर्म १६ आणि १७ पुनर्विकासाच्या कामासाठी १ फेब्रुवारीपासून बंद आहेत. त्यामुळे हावडा, मडगाव, बंगळूर आदी ठिकाणांहून येणाऱ्या काही गाड्यांना सीएसएमटीऐवजी दादर आणि ठाणे येथेच प्रवास थांबवावा लागत आहे. सुरुवातीला प्लॅटफॉर्म १६साठी १ फेब्रुवारी ते २६ एप्रिलदरम्यान ८५ दिवसांचा वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता, मात्र काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याने हा ब्लॉक १९ मे, १३ जून, ५ ऑगस्ट आणि २१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला.
त्यानंतर पुन्हा हा ब्लॉक ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने त्याचा एकूण कालावधी २१८ दिवसांवर पोहोचला. त्यामुळे चार मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांवर अद्याप परिणाम होत आहे. हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंत, तर मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंतच धावत आहे.
आरएलडीएच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाचे आतापर्यंत २८ टक्के भौतिक काम पूर्ण झाले असून, काम प्रगतिपथावर आहे, मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष कामाची स्थिती आणि प्लॅटफॉर्म पूर्णपणे उपलब्ध होण्याची प्रक्रिया यामध्ये अद्याप अंतर आहे. प्लॅटफॉर्म १६ आणि १७ पूर्णपणे प्रवाशांसाठी उपलब्ध होण्यापूर्वी १४ आणि १५ ताब्यात दिल्यास सीएसएमटीवरील गाड्यांचे परिचालन मोठ्या प्रमाणात विस्कळित होऊ शकते. त्यामुळे आणखी गाड्यांचे नियमन, शॉर्ट टर्मिनेशन किंवा इतर स्थानकांवरून परिचालन करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

प्लॅटफॉर्म तयार की केवळ ताब्यात?
प्लॅटफॉर्म १६चे काम पूर्ण करून तो मध्य रेल्वेकडे सुपूर्द केल्याचा दावा आरएलडीएकडून करण्यात आला आहे, मात्र प्लॅटफॉर्मचा ताबा मिळाला असला तरी प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेल्या नसल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. प्लॅटफॉर्म १७वर अजूनही आरएलडीएचे कर्मचारी आणि बांधकाम साहित्य आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून सध्या ट्रॅक आणि बॅलास्ट साफ करण्याचे काम सुरू आहे. प्लॅटफॉर्म १६ आणि १७वर प्रस्तावित उन्नत डेकसाठी खांब उभारण्यात आले आहेत. हा डेक नव्या इमारतीला उपनगरी प्लॅटफॉर्मशी जोडणार आहे. नव्या इमारतीत व्यावसायिक जागा आणि हॉटेलचीही तरतूद करण्यात आली आहे, मात्र सीएसएमटीच्या ऐतिहासिक घुमटाची उंची कायम ठेवण्याचे नियोजन आहे.

१४-१५ बंद झाल्यास १६-१८ गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम
प्लॅटफॉर्म १४ आणि १५वर दररोज सुमारे आठ ते नऊ जोड्या, म्हणजेच १६ ते १८ लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा होते. त्यामुळे हे दोन्ही प्लॅटफॉर्मही पुनर्विकासाच्या कामासाठी ताब्यात घेतल्यास सीएसएमटीची परिचालन क्षमता आणखी कमी होणार आहे. विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्म १६ आणि १७ पूर्णपणे प्रवाशांच्या वापरासाठी उपलब्ध होण्यापूर्वी १४ आणि १५ ताब्यात देणे कठीण असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

२०२६ची मुदत थेट २०२८वर
सीएसएमटी पुनर्विकासाची मूळ मुदत मार्च २०२६ होती. त्यानंतर ती मार्च २०२७ पर्यंत वाढविण्यात आली. आता प्रकल्पाची मुदत ऑक्टोबर २०२८ पर्यंत पुढे गेल्याचे समजते. सुमारे २,४५० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून सीएसएमटीला आधुनिक एकात्मिक वाहतूक केंद्राचे स्वरूप देण्यात येणार आहे. रूफ प्लाझा, फूड कोर्ट, प्रतीक्षालय, व्यावसायिक जागा, प्रवाशांची सुलभ हालचाल आणि विविध वाहतूक साधनांचे एकत्रीकरण अशा सुविधा प्रस्तावित आहेत. मुख्य वारसा इमारतीचे ऐतिहासिक स्वरूप मात्र कायम ठेवण्यात येणार आहे.

बांधकाम साहित्याअभावीही कामाला विलंब
दरम्यान, यावर्षी एप्रिलमध्ये पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचाही पुनर्विकासाच्या कामावर परिणाम झाला होता. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणासह काही सौंदर्यीकरणाच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या जिप्समच्या पुरवठ्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी विलंब झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT