‘ऐरोली विरुद्ध बेलापूर’ राजकीय वाद पेटला
सभागृह नेते सागर नाईकांच्या विरोधानंतर १०७ कोटींचे प्रकल्प रद्द
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत राजकीय संघर्ष आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा यामुळे बेलापूर मतदारसंघातील तब्बल १०७ कोटींहून अधिक खर्चाचे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आले आहेत. वाशी येथील ४५ कोटी ४८ लाखांचे अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि बेलापूर महापालिका मुख्यालय ते एअर इंडिया कॉलनीदरम्यानचा ६१ कोटी ५५ लाखांचा सेवा रस्ता, हे दोन्ही प्रस्ताव बहुमताने फेटाळले; मात्र या निर्णयामागे ‘ऐरोली विरुद्ध बेलापूर’ असा राजकीय आकस आणि वर्चस्वाचा वाद असल्याची जोरदार चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगली आहे.
वाशी सेक्टर-१० ए मधील २० हजार ४०० चौ.मी. भूखंडावर जी+२ स्वरूपाचे क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ठेवला होता. यामध्ये १०० मीटर ट्रॅक, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल आणि मल्टिस्पोर्ट्स हॉल यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश होता; परंतु सभागृह नेते सागर नाईक यांनी या प्रस्तावाला कडक विरोध दर्शवला. नेरूळ आणि वाशी परिमंडळ एकमध्ये आधीपासूनच क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. याउलट ऐरोली, घणसोली व रबाळे परिमंडळ दोन भागात पालिकेच्या सुविधा नाहीत. अमर्याद निधी नसल्याने निधीचे समान वाटप होणे गरजेचे आहे, अशी भूमिका नाईक यांनी घेतली. या निर्णयाला शिवसेनेच्या नगरसेविका सरोज पाटील आणि नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी तीव्र विरोध केला; परंतु विषय नामंजूर न करता स्थगित ठेवण्याची मागणी प्रशासनाने केली; परंतु सागर नाईक यांच्या सूचनेनुसार झालेल्या मतदानात बहुसंख्येने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. बेलापूर येथे होत असलेल्या सेवा रस्त्यालाही सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला. या मार्गावर रस्त्याऐवजी उड्डाणपूल तयार करावा, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी लावून धरली.
सेवा रस्ता रद्द करण्यामागे ‘मल्टिस्पेशालिटी रुग्णालया’चे राजकारण?
बेलापूर मतदारसंघातील आम्र मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ६१.५५ कोटींचा समांतर सेवा रस्ता बनवण्याचा प्रस्ताव पालिकेने आणला होता; मात्र केवळ एका विशिष्ट भागापुरता रस्ता करण्याऐवजी अपोलो रुग्णालय चौकात उड्डाणपूल उभारण्याचा आग्रह धरत हा प्रस्तावही सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. दरम्यान, या निर्णयामागे मूळ कारण वाहतूक कोंडी नसून राजकीय सूडबुद्धी असल्याचे बोलले जात आहे. बेलापूरमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकारातून महापालिकेतर्फे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले जात आहे. जेएनपीए ते उरण फाटादरम्यानचा हा समांतर सेवा रस्ता थेट या रुग्णालयाला जोडला जाणार होता; मात्र या रुग्णालयाला रस्ता उपलब्ध होऊ नये आणि प्रकल्पाचे श्रेय रोखता यावे, याच अप्रत्यक्ष हेतूने उड्डाणपुलाचे कारण पुढे करीत हा सेवा रस्ता रद्द केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
‘आकसपोटी निर्णय’ : विरोधकांचा थेट आरोप
प्रशासनाने योग्य तांत्रिक अभ्यास आणि व्हेईकल डेन्सिटी स्टडी करूनच हे दोन्ही प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणले होते; मात्र सर्व विकासकामे बेलापूर मतदारसंघातच का, असा प्रश्न उपस्थित करीत हे प्रस्ताव फेटाळण्यात आले. नगरसेविका सरोज पाटील व सुरेश कुलकर्णी यांनी, केवळ ऐरोली मतदारसंघाचा विचार करून आणि बेलापूरच्या विकासकामांबद्दल आकस ठेवून हे निर्णय घेतले जात आहेत, असा गंभीर आरोप केला. या राजकीय साठमारीत शहराच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि क्रीडा प्रकल्पांचा बळी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सेवा रस्ता आणि क्रीडा संकुलाचे प्रस्ताव नामंजूर करण्यामागे राजकीय आकस नाही. या प्रकल्पांमुळे जनतेला फायदा होणार नव्हता. सेवा रस्त्याऐवजी उड्डाणपूल असावा, अशी सर्व नगरसेवकांनी मागणी केली. तर फक्त वाशीत क्रीडा संकुल न करता ऐरोली मतदारसंघातही करायला निधी शिल्लक असायला हवा, याकरिता हे प्रस्ताव नामंजूर केले. यात कोणतेही राजकारण नाही.
- अशोक पाटील, सभापती, स्थायी समिती, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.