भव्यतेपेक्षा भक्ती, पर्यावरण महत्त्वाचे ः मुख्यमंत्री
१० हजार बालहातांनी घडवला जागतिक विक्रम
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः ढोल-ताशांचा मंगल गजर, शाडू मातीचा सुवास आणि गणेशाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हजारो बालहातांचे कलात्मक स्पर्श... वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक अभूतपूर्व आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा सोहळा झाला. ‘पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’च्या माध्यमातून एकाच वेळी १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले. भव्यतेपेक्षा भक्तीचा भाव आणि निसर्गाचे संवर्धन हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिला.
या जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, वनमंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रवींद्र फाटक, पर्यावरण सचिव श्रीमती जयश्री भोज, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, महापालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि कला संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यावरणाशी नाते जोडणाऱ्या संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ‘‘गणराया ही बुद्धीची देवता असून निसर्गाच्या पंचमहाभूतांचे रक्षण झाले, तरच मानवी जीवन सुरक्षित राहू शकते. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगांमुळे जलस्रोतांची होणारी हानी टाळणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मूर्तीचा आकार लहान असो वा मोठा, भक्ती नेहमी सारखीच असते. ईश्वराचा आशीर्वाद हा मूर्तीच्या आकारावर नव्हे, तर आपण समाजाची आणि निसर्गाची किती निःस्वार्थ सेवा करतो यावर ठरतो,’’ असे प्रतिपादन त्यांनी केले. गिनीज रेकॉर्डच्या परीक्षकांनी निकाल जाहीर करताच मुख्यमंत्र्यांनी या विक्रमाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.
------------------------------------------
मुख्यमंत्र्यांनी घडवली गणरायाची मूर्ती
या सोहळ्यातील सर्वात भावुक आणि खास क्षण ठरला तो म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः शाडू मातीची गणेशमूर्ती साकारली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी, ‘‘मातीतून गणेशमूर्ती घडवणाऱ्या या हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःला ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून सिद्ध केले आहे,’’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-----------------------------------------
नवी मुंबई ः वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत स्वतः मूर्ती घडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
(छायाचित्र ः सत्यवान वास्कर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.