चेंबूरमध्ये सहा मांजरांची हत्या
अनाेळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा
चेंबूर, ता. १० (बातमीदार) : येथील पांजरापोळ सर्कल परिसरातील शनिमंदिरजवळ सहा भटक्या मांजरांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मांजरांना नियमितपणे खाद्य देणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी अनाेळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रादार महिलेने गेल्या काही महिन्यांत २० हून अधिक मांजरांची हत्या झाल्याचा दावा केला आहे.
पांजरापोळ सर्कल परिसरातील शनिमंदिराजवळ अनेक भटक्या मांजरी आहेत. या परिसरात राहणाऱ्या रुबिना पठाण (वय ५३) या मांजरांना दररोज खाद्य देतात. रविवारी नेहमीप्रमाणे त्या मांजरांना खाद्य देण्यासाठी शनिमंदिर परिसरात गेल्या असता, त्यांना सुरुवातीला दोन मांजरी मृतावस्थेत आढळल्या. दोन्ही मांजरांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी परिसरात पाहणी केली असता काही अंतरावर आणखी चार मांजरी मृतावस्थेत आढळल्या. या मांजरांच्या डोक्यावर प्रहार केल्याच्या खुणा हाेत्या. त्यामुळे अनाेळखी व्यक्तीने प्राणघातक हल्ला करून या सहा मांजरांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेबाबत पठाण यांनी तत्काळ परिसरातील ‘पेटा इंडिया’ या प्राणीप्रेमी संस्थेला माहिती दिली. त्यानंतर या संस्थेच्या मदतीने मृत मांजरांना परळ येथील प्राण्यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीत मांजरांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी पठाण यांच्या तक्रारीवरून आरसीएफ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य माहितीच्या आधारे आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
----
५० हजारांचे बक्षीस
चेंबूरमध्ये मांजरी मृत आणि विद्रूप अवस्थेत आढळल्यानंतर सिरीयल कॅट किलरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास पेटा इंडियाने ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या गुन्ह्याबाबत माहिती असलेल्या कोणत्याही व्यक्तीने पेटा इंडियाशी info@petaindia.org या ई-मेलवर संपर्क साधावा. जे लोक प्राण्यांवर अत्याचार करतात, ते अनेकदा पुढे जाऊन इतर प्राणी आणि मानवांनाही इजा पोहोचवतात. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अशा क्रूरतेची माहिती पोलिसांना देणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे ‘पेटा इंडिया’च्या क्रुएल्टी रिस्पॉन्स ऑफिसर ईशानी राठी यांनी आवाहन केले आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.