ऐरोलीत महावितरणचा ‘सर्जिकल स्ट्राइक’!
एकाच दिवसात १०५ ठिकाणी वीजचोरी उघडकीस
३१.३१ लाखांचा डल्ला, चोरांवर कठोर कारवाईचा बडगा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : महावितरणने ऐरोली उपविभागात वीजचोरांविरोधात धडक मोहीम राबवली आहे. अनधिकृत इमारतींमध्ये सुरू असलेल्या वीजचोरीचा पर्दाफाश करत महावितरणने एकाच दिवसात तब्बल १०५ ठिकाणी वीजचोरी आणि अनियमितता उघडकीस आणली आहे. या कारवाईमुळे ऐरोली परिसरातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार तब्बल ७८ प्रकरणांमध्ये एक लाख ४३ हजार ०६३ युनिट म्हणजे ३१.३१ लाखांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले असून, संबंधितांवर कारवाईचा फास आवळला जात आहे. भांडुप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील व वाशीचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३ सप्टेंबर रोजी ही मोहीम राबवण्यात आली. पाच कार्यकारी अभियंत्यांसह ५५ हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सात विशेष पथकांनी ऐरोली गाव, साईनाथ वाडी, देशमुख वाडी, गोठवली आणि घणसोली येथील अनधिकृत इमारतींवर एकाच वेळी छापे टाकले. वीजजोडण्या, मीटरमधील फेरफार आणि अनधिकृत वापराची सखोल तपासणी करून वीजचोरीची पाळेमुळे उखडून काढली. वीजचोरीमुळे प्रामाणिक ग्राहकांवर होणारा अन्यायाचा भार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महावितरणने दिला आहे. वीजचोरी हा गंभीर दखलपात्र गुन्हा असून, यामध्ये भारी दंड आणि तुरुंगवासाची कठोर तरतूद आहे. कोणत्याही क्लृप्त्या वापरून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई अटळ आहे. ही शोधमोहीम अधिक तीव्र गतीने सुरूच राहील, असे महावितरणने सांगितले आहे.
विविध अपार्टमेंट्समध्ये उघडकीस आलेली वीजचोरी :
स्मशानभूमी गार्डन (२ ग्राहक) : ९.६३ लाख (३९,६२९ युनिट)
माउली अपार्टमेंट (१८ ग्राहक) : ५.३३ लाख (२६,७५५ युनिट)
पनशील अपार्टमेंट (३ ग्राहक) : ३.१८ लाख (११,७०० युनिट)
मातोश्री अपार्टमेंट (११ ग्राहक) : २.५४ लाख (१२,९५६ युनिट)
भागीरती इमारत (९ ग्राहक) : २.२३ लाख (११,६६४ युनिट)
ओमसाई अपार्टमेंट (१२ ग्राहक) : १.८६ लाख (११,१६७ युनिट)
कृष्णा हाईट्स (६ ग्राहक) : १.२० लाख (५,५३० युनिट)
सिहांकित निवास गार्डन (८ ग्राहक) : ९१ हजार (४,७३२ युनिट)
शारदा अपार्टमेंट (२ ग्राहक) : ३२ हजार (१,९३७ युनिट)
इतर ठिकाणी (७ ग्राहक) : ४.११ लाख (१६,९९३ युनिट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.