डॉक्टरांसाठी क्यूआर कोड प्लेट अनिवार्य
३१ ऑक्टाेबरपर्यंत मुदत; कार्यवाही न झाल्यास दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला आता आपल्या वैद्यकीय प्रॅक्टिसच्या ठिकाणी ‘तुमच्या डॉक्टरला ओळखा’ अर्थात ‘केवायडी’ची अधिकृत क्यूआर कोड प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी डॉक्टरांना ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी)ने याबाबत बुधवारी अधिसूचना जारी केली असून, राज्यातील सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसाठी हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये बनावट एमएमसी प्रमाणपत्र सादर करून काही डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर खासगी तसेच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतही बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणारे काही डॉक्टर आढळले होते. हे प्रकरण मानवाधिकार आयोगापर्यंत गेले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नोंदणीकृत डॉक्टरांसाठी क्यूआर कोड असलेली ‘केवायडी’ प्लेट उपलब्ध केली आहे.
रुग्ण आपल्या मोबाईलद्वारे या क्यूआर कोडचे स्कॅनिंग करून संबंधित डॉक्टराचा एमएमसी नोंदणी क्रमांक तसेच त्याच्या नोंदणीची वैधता याबाबतची माहिती तत्काळ पाहू शकतील. त्यामुळे डॉक्टरची नोंदणी खरी आहे की नाही, तसेच ती वैध आहे की नाही, याची खात्री रुग्णांना करता येणार आहे.
प्रत्येक प्रॅक्टिसच्या ठिकाणी स्वतंत्र प्लेट
एखादा डॉक्टर एकापेक्षा अधिक ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करत असल्यास त्याला प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र क्यूआर कोड प्लेट घ्यावी लागणार आहे. ही प्लेट रुग्णालय, दवाखाना किंवा प्रॅक्टिस सेंटरच्या प्रतीक्षालयात रुग्णांना सहज दिसेल आणि स्कॅन करता येईल, अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे. क्यूआर कोडची छायाचित्रे, स्क्रीनशॉट किंवा कागदावर काढलेली प्रत ग्राह्य धरली जाणार नाही. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने जारी केलेली प्रत्यक्ष भौतिक ‘केवायडी’ प्लेटच वैध मानली जाईल, असे एमएमसीने स्पष्ट केले आहे.
अशी हाेणार कारवाई
क्यूआर कोड प्लेट न लावल्यास सत्यापित सार्वजनिक तक्रारीच्या आधारे कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर डॉक्टरांना १५ दिवसांचा अवधी देण्यात येईल. दुसऱ्या वेळेस पाच हजार रुपयांचा दंड, तर त्यानंतर १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही दुर्लक्ष केल्यास डॉक्टरांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.