डॉक्टरची दोन कोटी २४ लाखांची फसवणूक
ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ओडिशातील एका कंपनीचा ५०० कोटी रुपयांचा खाणकामाचा ठेका मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका डॉक्टरची दोन कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात संजीव शंकर आव्हाड आणि शुभम संजीव आव्हाड यांच्यासह तपासात निष्पन्न होणाऱ्या इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉक्टरांनी तक्रारीत केली आहे.
तक्रारदार डॉ. अमोल घुले हे पत्नीसमवेत रुग्णालय चालवतात. तसेच ते भाऊ डॉ. राहुल घुले यांच्यासोबत एक व्यवसाय करतात. व्यावसायिक संबंधातून त्यांची फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये संजीव आव्हाड यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर आव्हाड कुटुंबीयांनी घुले कुटुंबाशी सलगी वाढवून कौटुंबिक संबंध निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, आव्हाड आणि त्यांचा मुलगा शुभम यांनी घुले बंधूंची भेट घेऊन त्यांच्या कंपनीचा मोठा व्यवसाय असून, ओडिशातील एका कंपनीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा खाणकामाचा ठेका मिळणार असल्याचे सांगितले. हा ठेका मिळाल्यास सुमारे १०० कोटी रुपयांचा नफा होईल, असे प्रलोभन दाखविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हा ठेका मिळवून देण्यासाठी केंद्रीय खाणकाम मंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवावे लागतील, असे सांगून सुरुवातीला दोन कोटी आठ लाख रुपये रोख मागण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार घुले यांनी २८ व २९ मार्च २०२५मध्ये प्रत्येकी एक कोटी आणि २ जूनमध्ये आठ लाख रुपये, अशी एकूण दोन कोटी आठ लाखांची रोकड आव्हाड पिता-पुत्रांकडे दिल्याचा दावा तक्रारीत केला आहे. यानंतर विश्वास बसावा म्हणून एका कंपनीच्या नावाने विविध पत्रे व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आली. त्यात ‘कन्फर्मेशन लेटर’, ‘लेटर ऑफ इंटेंट’, ‘व्हेंडर कोड’ आणि बैठकीसंदर्भातील पत्रांचा समावेश होता; मात्र ठेका मिळाला नाही. डिसेंबर २०२५ मध्ये आणखी १६ लाख रुपये भरल्यास ठेका मिळेल, असे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार घुले यांनी पाच लाख रुपये एका व्यक्तीच्या खात्यावर, तर ११ लाख रुपये संजीव आव्हाड यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पाठविले. अशा प्रकारे एकूण दोन कोटी २४ लाख रुपये दिल्यानंतरही ठेका मिळाला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. संशय बळावल्यानंतर घुले यांनी संबंधित कंपनीकडे चौकशी केली असता आव्हाड यांचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले. तसेच व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आलेली पत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.