गणेश विसर्जन व मिरवणुकांवर नियमांचा अंकुश
नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेचा लागणार कस
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : श्री गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, गणेशमूर्ती विसर्जन आणि विसर्जन मिरवणुकांदरम्यान प्रशासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पालिका आणि पनवेल पालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश, राज्य सरकारची नियमावली आणि विसर्जनाच्या दिवशी होणारी अलोट गर्दी या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच उत्सवाचा आनंद द्विगुणित ठेवताना दोन्ही पालिकांची मोठी प्रशासकीय कसरत होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहा फुटांपर्यंतच्या घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करणे बंधनकारक केले आहे. दोन्ही पालिकांनी मिळून १५० पेक्षा अधिक कृत्रिम तलाव उभारले असले तरी, पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक तलावातच विसर्जन करण्याच्या भाविकांच्या आग्रहाला मोडणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. भाविकांच्या धार्मिक भावना न दुखावता नियमांचे पालन करून घेताना पालिका कर्मचाऱ्यांचा कस लागणार आहे. गेल्या वर्षी दीड दिवसाच्या विसर्जनावेळी मिरवणूक मार्गांवर पडलेले खड्डे आणि सखल भागात लटकणाऱ्या विजेच्या व इंटरनेटच्या तारांमुळे मिरवणुकांमध्ये मोठा व्यत्यय आला होता. यंदा रस्त्यांची दुरुस्ती केल्याचा दावा पालिका करीत असली तरी, ऐनवेळी पडणारा पाऊस आणि अवजड वाहनांमुळे निर्माण होणारे खड्डे यावर वेळेत मात करणे, ही पालिकांच्या पायाभूत सुविधा व बांधकाम विभागासाठी डोकेदुखी ठरणार आहे. वाशी खाडीपुलावरून मुंबईतील अनेक मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी अथवा पुढे जाण्यासाठी नवी मुंबईच्या हद्दीत प्रवेश करतात. सायन-पनवेल महामार्ग, पाम बीच रोड आणि पनवेल शहरातील मुख्य रस्त्यांवर एकाच वेळी शेकडो विसर्जन मिरवणुका आल्यास होणारी वाहतूक कोंडी रोखणे, हे पालिका व ट्रॅफिक पोलिसांच्या समन्वयासाठी मोठे आव्हान असेल. प्लॅस्टिक व थर्माकोलमुक्त सजावटीचे आवाहन करण्यात आले आहे. लहान मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मूर्ती लहान पण भावना महान’ पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. जीवरक्षक, अग्निशमन पथके, प्रथमोपचार केंद्र, तराफे, फोर्कलिफ्ट्स आणि मुख्य विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही व पुरेसा प्रकाश तैनात करण्यात आला आहे. सार्वजनिक मंडळांसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे मोफत परवानग्या दिल्या जात असून विसर्जन स्थळांवर पिण्याचे पाणी, मोबाईल शौचालय, जनरेटर व्यवस्था व आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.
ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण कसे मिळवणार?
विसर्जन मिरवणुकांमध्ये डिझेल जनरेटर, हाय-डेसिबल ध्वनिक्षेपकांचा अनधिकृत वापर आणि घातक लेझर लाइट्सवर असलेली बंदी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष घाटांवर लागू करणे कठीण मानले जात आहे. गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांशी वाद न घालता रात्रीच्या वेळेत ध्वनी मर्यादेचे पालन करून घेणे प्रशासकीय कौशल्याची परीक्षा घेणारे ठरेल.
विद्युत सुरक्षा आणि तांत्रिक आपत्कालीन व्यवस्था
गेल्या वर्षी तात्पुरत्या वायरिंग आणि विजेच्या दिव्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदा इलेक्ट्रिकल आणि सेफ्टी ऑडिट करण्यात आले असले तरी, पावसाच्या काळात विसर्जन घाटांवर शॉक लागण्याचा धोका टाळणे, फोर्कलिफ्ट्स, जनरेटर, तराफे आणि जीवरक्षकांची तातडीने उपलब्धता ठेवणे यामध्ये यंत्रणेत कोणताही तांत्रिक बिघाड न होणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या उपाययोजना
कडक सेफ्टी आणि इलेक्ट्रिकल ऑडिट : सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही महापालिकांनी सर्व विसर्जन घाटांवरील विद्युत उपकरणे, वायरिंग, जनरेटर संच आणि तात्पुरत्या मंचांची आधीच कसून तपासणी केली आहे.
रस्ते दुरुस्ती व ओव्हरहेड वायर व्यवस्थापन : विसर्जन मार्गांवरील खड्डे भरण्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले असून, मिरवणुकीत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि लटकणाऱ्या केबल्स हटवण्यात आल्या आहेत.
कृत्रिम तलावांची संख्या वाढवणे : नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या १५० हून अधिक केली आहे, जेणेकरून मुख्य नैसर्गिक तलावांवरील गर्दीचा ताण कमी होईल.
सुसज्ज निर्माल्य व्यवस्थापन : जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक विसर्जन स्थळावर स्वतंत्र निर्माल्य कलश आणि निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी निर्माल्य रथांची सोय करण्यात आली आहे.
वाहतूक आणि गर्दीचे नियंत्रण : ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने विसर्जन घाटांकडे जाणाऱ्या मार्गांवर एकेरी वाहतूक व पार्किंगची स्वतंत्र रचना केली आहे, तसेच सुरक्षेसाठी जीवरक्षक आणि स्वयंसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.