खोत लेन पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात
पदपथ झाले गायब; पालिका शाळेलाही फेरीवाल्यांचा घेरा
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेतील खोत लेन मार्गावर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी आपले बस्तान थाटल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे अनेक रस्ते व पदपथ मोकळे झाले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंडावल्याचे दिसून येत असून, खोत लेन परिसरात फेरीवाल्यांची संख्या पुन्हा वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
खोत लेन मार्गावरील बहुतांश पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले असून, त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील मुंबई पब्लिक स्कूल या पालिका शाळेच्या आजूबाजूलाही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढत आहे.
मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार काही महिन्यांपूर्वी पदपथ मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत अनेक ठिकाणी कठोर कारवाई करून अतिक्रमणे हटविण्यात आली होती, मात्र सध्या खोत लेन परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने ही कारवाई थांबली का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासनाने नियमित आणि सातत्यपूर्ण कारवाई करून पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवावेत, शाळांच्या परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फेरीवाल्यांनी पदपथ व्यापणे ही समस्या आहेच; मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे संबंधित पालिका अधिकारी ही त्याहून मोठी समस्या आहे. अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होऊन कारवाई झाल्याशिवाय फेरीवाल्यांवरील कारवाईचा दिखावा सुरूच राहील.
– डॉ. वेदप्रकाश तिवारी, ॲडव्होकेट, उच्च न्यायालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.