सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : आश्रमशाळांमध्ये साप दिसला तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. सर्पदंश झाल्यास अंगावर झाडपाला, माती किंवा अन्य पदार्थ लावण्याऐवजी तातडीने रुग्णालय गाठा, असे डोंगराळ आणि जंगलालगतच्या आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता सर्पदंशापासून बचावाचे हे धडे महत्त्वाचे ठरणार आहेत. गडचिरोलीतील आश्रमशाळेत १८ ऑगस्टला सर्पदंशाची गंभीर घटना घडल्यानंतर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये १९ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष जनजागृती अभियान राबविले जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत एकूण ५४ आश्रमशाळा आहेत. यामध्ये ३३ शासकीय निवासी आश्रमशाळा, तर २१ अनुदानित आश्रमशाळा आहेत. या शाळा विशेषतः शहापूर, मुरबाड आणि भिवंडी यांसारख्या ग्रामीण व आदिवासी भागात चालवल्या जातात. हजारो विद्यार्थी या आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. गेल्या महिन्यात गडचिरोली येथे सरपंच घटनेनंतर या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचाही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सापांपासून बचावासाठी आश्रम शाळा भोवती उंच भिंती बांधल्या असल्या तरी हा उपाय पुरेसा नाही.
वनक्षेत्रालगतच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचा साप, विंचू किंवा अन्य वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता असते. त्यामुळे साप चावल्यावर उपचारापेक्षा आधी केलेल्या चुकीच्या उपायांमुळे परिस्थिती गंभीर होऊ नये, यासाठी आता जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्पदंश बचावाचे धडे देण्यात येणार आहे.
गैरसमज आणि उपचारावर भर
सर्पदंशाबाबतची भीती आणि गैरसमज दूर करून योग्य वेळी योग्य उपचार मिळणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.
साप दिसला तरी त्याच्या जवळ जाण्याची घाई करू नये. सुरक्षित अंतर ठेवून शांतपणे त्या ठिकाणापासून दूर व्हावे. सापाला पकडण्याचा, हुसकावण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न केल्यास धोका वाढू शकतो. विद्यार्थ्यांना या प्राथमिक सुरक्षिततेबरोबरच सर्पदंश झाल्यानंतर बाधित व्यक्तीची हालचाल कमीत कमी ठेवण्याचे आणि शक्य तितक्या लवकर आरोग्य केंद्रात नेण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वेळेत उपचारावर लक्ष
सर्पदंशाच्या उपचारात वेळ महत्त्वाचा असल्याने प्रत्येक आश्रमशाळेकडे जवळचे आरोग्य केंद्र, ‘एएसव्ही’ उपलब्ध असलेले केंद्र आणि आपत्कालीन वाहतुकीची माहिती तयार ठेवली जाणार आहे. मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिकांना ही माहिती दर तीन महिन्यांनी अद्ययावत करावी लागणार आहे.
प्रात्यक्षिकाला बंदी
सर्पदंशाबाबत जनजागृती करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष साप दाखविण्याच्या मोहापासूनही विभागाने शाळांना दूर ठेवले आहे. शाळेच्या परिसरात जिवंत साप आणून प्रात्यक्षिक करण्यास सक्त मनाई केली आहे. त्याऐवजी सर्पतज्ज्ञ, सर्पमित्र, आरोग्य आणि वन विभागाच्या तज्ज्ञांकडून सुरक्षित पद्धतीने मार्गदर्शन केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.