राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : चेहऱ्यावर नेहमीसारखे भाव, पण मनात मात्र प्रचंड वादळ. कुणाला नात्यातील ताण अस्वस्थ करतो, कुणाला घरातील संघर्ष छळतो, तर कुणाच्या मनावर कामाचा किंवा आर्थिक विवंचनेचा भार असतो. हे दुःख कुणाशी बोलून दाखवता आले नाही की माणूस स्वतःभोवतीच एक भिंत उभी करतो. याच अंधारात काही जण आयुष्य संपविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा निर्णायक क्षणी मिळालेला आधार आयुष्याची दिशा बदलू शकतो. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञांनी मागील आठ महिन्यांत अशाच ४२ जणांना मानसिक आधार देत पुन्हा जगण्याकडे वळविण्याचे काम केले आहे.
जानेवारी ते ऑगस्ट या काळात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ४२ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये २० पुरुष आणि २२ महिलांचा समावेश आहे. शारीरिक उपचारांबरोबरच त्यांच्या मनावर झालेल्या आघाताकडेही गांभीर्याने पाहण्यात आले. ‘काय झाले?’ एवढ्यावर न थांबता ‘तुमच्या मनात काय सुरू आहे?’ हा प्रश्न विचारत तज्ज्ञांनी त्यांच्याशी संवाद साधला. रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विजय तेली, डॉ. यशवंत सोळंकी, समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद आणि मनोरुग्णतज्ज्ञ शर्मिला पठारे यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून रुग्णांशी संवाद साधला. मानसिक तणावाची कारणे समजून घेत त्यानुसार उपचार आणि आवश्यक औषधोपचार करण्यात आले.
समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद यांच्या मते, मानसिक तणावामागे मेंदूतील रासायनिक बदलांसोबतच संवादाचा अभाव आणि सामाजिक एकटेपणा ही महत्त्वाची कारणे ठरू शकतात. मनातील दुःख कुणाशी व्यक्त करता न आल्याने ताण वाढत जातो. त्यामुळे समस्या कितीही मोठी वाटत असली तरी ती मनात दडवून ठेवण्याऐवजी कोणाशी तरी बोलणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेणे हा त्यातून बाहेर पडण्याचा पहिला मार्ग आहे.
गेल्या वर्षी १२४ जण रुग्णालयात
जानेवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न केलेले १२४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यात ५२ पुरुष आणि ७२ महिलांचा समावेश होता. यंदा याच कालावधीत ४२ रुग्ण दाखल झाले असून, त्यामध्ये महिलांची संख्या २२ आहे.
महिलांचे प्रमाण चिंताजनक
कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, भावनिक ताण आणि नात्यांमधील संघर्ष यांसारख्या कारणांमुळे महिलांमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घरातील व्यक्तींच्या वागण्यात अचानक बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.