स्क्रीनकडे न पाहता रोज दहा पाने वाचा
‘सकाळ एनआयई’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांचे आवाहन
प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) : ‘‘आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात काही वेळ मोबाईलला हात न लावता, टीव्ही व अन्य स्क्रीनकडे न पाहता दररोज किमान दहा पाने सलग वाचली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वाचनाचे हे आव्हान स्वीकारले पाहिजे,’’ असा कानमंत्र शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.
मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने ‘सकाळ एनआयई’ आणि शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने वरळी येथील मराठा हायस्कूलच्या सभागृहात गुरुवारी मराठा हायस्कूल आणि मराठा मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘एनआयई’ वर्तमानपत्र व स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या वेळी शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस महेश खवणेकर, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विश्वस्त जीवन भोसले, मराठा हायस्कूलचे सहसचिव राज साखरकर, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक नवनाथ कदम, पुंडलिक लोकरे, मराठा मंदिरचे बाबासाहेब गावडे, हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर शिंदे, सोपान मोरे आदी उपस्थित होते.
‘‘वर्तमानपत्रांमधील लेख आणि अग्रलेख वाचनीय असतात. ते आवर्जून वाचले पाहिजेत. त्यातील चांगल्या बातम्याही वाचल्या पाहिजेत. आपण सध्या वाचन विसरत चाललो आहोत. यूट्युब किंवा ‘एआय’सारखे नवे तंत्रज्ञान नक्कीच उपयोगी आहे; मात्र त्याबरोबरच वाचनही तितकेच महत्त्वाचे आहे,’’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांचे शाळेत आगमन होताच विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. त्याच उत्साहात आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शेजारी बसून कार्यक्रमात सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या.
‘सकाळ एनआयई’ आवर्जून वाचा!
‘‘‘सकाळ’ माध्यम समूहाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले ‘एनआयई’ हे वर्तमानपत्र अत्यंत उपयुक्त आहे. ते आवर्जून वाचा. तसेच ग्रंथालयातून किंवा दुकानातून तुम्हाला आवडणारे एखादे पुस्तक घ्या आणि वाचनाची मजा काय असते, याचा अनुभव घ्या,’’ असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
सामाजिक आणि शैक्षणिक भावनेतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि वाचनसंस्कृती टिकावी, यासाठी ‘सकाळ’ने सुरू केलेल्या या उपक्रमात आम्ही सहभाग घेतला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- संजय कदम,
अध्यक्ष, शिवसह्याद्री फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.