मोतीलालनगरला १५ एकर हरित क्षेत्र
मध्यवर्ती ठिकाणी उभी राहणार पर्यावरणपूरक टाऊनशिप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : म्हाडाने हाती घेतलेल्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पातून येथे तब्बल १५ एकर हरित क्षेत्राची निर्मिती होत आहे. ऐन मध्यवर्ती, दाटीवाटीच्या परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पात अशा मोठ्या प्रमाणातील हरित क्षेत्र मुंबईतील उत्तर-पश्चिम उपनगरांच्या ‘ऑक्सिजन’मध्ये भर घालणारे ठरणार आहे.
मोतीलालनगरमध्ये सुमारे १४३ एकर भूखंडावरील या वसाहतींचा पुनर्विकास म्हाडाद्वारे सी अँण्ड डीए (बांधकाम व विकास संस्था) मॉडलद्वारे करीत आहे. मोतीलालनगरमधील सुमारे ३,७०० म्हाडा रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या आराखड्यानुसार येथे १५ एकरांचे हरित क्षेत्र असणार आहे. तसेच पुनर्वसन इमारतींच्या पोडीयम स्तरावरील मुख्य, मोठ्या हरित क्षेत्रांसह वसाहतीतील अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात हरित जागा असेल, असे म्हाडाने म्हटले आहे. ‘क्लस्टर पुनर्विकास म्हणजे केवळ नवीन घरे उभारणे नव्हे, तर सर्वांगीण सक्षम नागरी वसाहत उभी करणे आहे. मोतीलालनगरमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, शाश्वत नियोजन आणि सुमारे १५ ते १७ एकरांवरील हरित क्षेत्राच्या निर्मितीवर विशेष भर देण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकल्पात उद्याने आणि मोकळ्या जागांचा समावेश करून, निसर्ग आणि नागरी जीवन यांचा उत्तम समतोल साधणारी एक भविष्याभिमुख वसाहत (नेबरहुड) निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
१ं,५०० हून अधिक वृक्षांचेही संवर्धन
मोतीलालनगर वसाहतीत सध्या असलेल्या तब्बल १,५०० हून अधिक वृक्षांची तोडणी न करता त्यांचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडाने घेतला आहे. यामध्ये भेंड (इंडियन ट्युलिप), कडुलिंब, वड, कदंब, जांभूळ, उंबर, आंबा, फणस, नारळ, सप्तपर्णी, देशी बदाम अशा अनेक भारतीय प्रजातीच्या वृक्षांचे संवर्धन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.