गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या विक्रोळी, कुर्ला, चेंबूर शाखांचा उपक्रम
मुंबई, ता. १३ : सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबईच्या विक्रोळी, कुर्ला व चेंबूर शाखांतील सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा दादर येथील सेकंडरी भवन येथे संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. कार्यक्रमाला सभासद व त्यांच्या पाल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यांचा या वेळी सन्मान करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘‘तुम्ही गुणवंत आहातच; मात्र यापुढे कीर्तिवंत व्हावे, यासाठी संस्थेकडून ही कौतुकाची थाप आहे. उच्च शिक्षणाबरोबरच शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा. आधुनिक काळातील विविध प्रलोभनांना बळी न पडता आपल्या कुटुंबाची व सभासदांची मान समाजात खाली जाईल, असे कोणतेही कृत्य करू नये,’’ असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा देताना ते म्हणाले की, संस्थेच्या महाराष्ट्रात २८ शाखा असून, सुमारे ३३ हजार सभासद आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल सुमारे २,६०० कोटी रुपये असून, सभासदांनी १,२०० कोटी रुपयांहून अधिक ठेवी संस्थेत ठेवल्या आहेत.
कर्जपुरवठा व ठेवी स्वीकारण्यापुरते संस्थेचे कामकाज मर्यादित न ठेवता सभासदांच्या हितासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. सभासदाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कर्ज माफ करणारी ‘जीवन सुरक्षा ठेव योजना’, आरोग्यासाठी मेडिक्लेम कॅशलेस योजना, पर्यटन विभाग, मोबाईल ॲपद्वारे खाते तपासण्याची सुविधा, आरटीजीएस-एनईएफटी सेवा यांचा त्यात समावेश आहे. भविष्यात एटीएम सुविधा सुरू करण्याचा संस्थेचा मानस असून, विविध शाखांमध्ये सभासदांसाठी अतिथीगृहांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दादर येथे संस्थेची स्वमालकीची ‘सेकंडरी भवन’ ही इमारत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरून संस्थेबाबत चुकीची माहिती किंवा बदनामीकारक संदेश पसरविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे सांगत डॉ. पाटील यांनी सभासदांना अशा संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. संस्थेच्या निवडणुका जवळ आल्यावर अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जाऊ शकतात; त्यामुळे सभासदांनी त्याला बळी पडू नये, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार सतेश शिंदे यांनी केले. सहसचिव सतीश माने यांनी प्रास्ताविक केले, तर मानद सचिव किशोर पाटील यांनी आभार मानले. संस्थेचे संचालक प्रमोद देशमुख, गोविंद सुळ, शकील अन्सारी, संचालिका जयश्री गव्हाणे, वैशाली बैलोसे तसेच कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.