वज्रेश्वरी, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील ४००हून अधिक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना गणेशोत्सवाच्या काळातही निवृत्तीवेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दर महिन्याला वेळेवर निवृत्तीवेतन मिळत नसल्याने औषधोपचार, घरखर्च आणि दैनंदिन गरजांचे नियोजन कोलमडत असल्याची व्यथा वयोवृद्ध शिक्षकांनी व्यक्त केली आहे. ठाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
भिवंडी तालुक्यात ४००हून अधिक सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. काही शिक्षकांचे वय ८० वर्षांपेक्षा अधिक आहे. वयोमानानुसार औषधोपचार, आरोग्य तपासणी तसेच दैनंदिन खर्चासाठी निवृत्तीवेतन हाच त्यांचा प्रमुख आर्थिक आधार आहे. मात्र, पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथून पेन्शनधारक शिक्षकांचे अनुदान दर महिन्याला वितरित केले जात असल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही ठाणे जिल्हा परिषद स्तरावर संबंधितांच्या खात्यावर निवृत्तीवेतन जमा होण्यास विलंब का होतो, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. अनुदान प्राप्त झाल्यानंतर ते खात्यावर जमा करण्याची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सांगितले की, निवृत्तीवेतन वेळेवर मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पेन्शन वितरण सुरळीत करावे; अन्यथा ठाणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
पर्यायी बँकेची मागणी
सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्तीवेतन भिवंडी शहरातील अजय नगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जमा होते. मात्र, या शाखेतूनही पेन्शन वेळेवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने पेन्शन वितरणासाठी पर्यायी बँकेची व्यवस्था करावी किंवा इच्छुक शिक्षकांना अन्य बँकेत पेन्शन खाते वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.