गणेशोत्सवाच्या खरेदीला उधाण
रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त; दादर, माटुंगा, लालबागमध्ये ग्राहकांची झुंबड
प्रभादेवी, ता. १३ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईमधील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गणरायाच्या आगमनासाठी आवश्यक पूजासाहित्य, फुले, हार, सजावटीच्या वस्तू, मखर, रोषणाई तसेच विविध प्रकारच्या गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे दादर, माटुंगा, लालबाग परिसरातील प्रसिद्ध बाजारपेठा अक्षरशः हाउसफुल झाल्या असून, अनेक ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दादर पश्चिमेकडील फुलबाजार परिसर, एन. सी. केळकर मार्ग, रानडे रोड, दादर टीटी परिसर तसेच लालबागमधील अनेक भागांतील रस्त्यांवर सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ होती. गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी आकर्षक फुलांच्या माळा, तोरणे, कृत्रिम फुले, विविध प्रकारच्या लाइट्स, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच साखर, फुटाणे व मिठाईच्या दुकानात महिला व कुटुंबांची मोठी गर्दी होत आहे.
यंदा पारंपरिक सजावटीसोबतच पर्यावरणपूरक आणि घरच्या घरी करता येणाऱ्या सजावटीच्या साहित्यालाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. कागदी साहित्य, नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू आणि आकर्षक मखरांना मागणी वाढली आहे.
गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम होत असून, नागरिकांना बाजारातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. मात्र गर्दी आणि वाहतूक कोंडीची पर्वा न करता गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक खरेदी करण्याचा उत्साह नागरिकांमध्ये दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांत दादरची बाजारपेठ नेहमीच मुंबईकरांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिली आहे. यंदाही बाजारपेठेतील गजबज आणि ग्राहकांचा उत्साह पाहता गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होण्यापूर्वीच दादरमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दादरच्या बाजारपेठेत सजावटीच्या वस्तू, फुलं आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी आलो आहे. यंदा बाजारात विविध प्रकारचे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. गर्दी मोठी असली तरी गणेशोत्सवाच्या उत्साहामुळे ही गर्दीही आनंद देणारी वाटते. आपल्या लाडक्या बाप्पासाठी मनापासून खरेदी करण्याचा आनंद काही औरच आहे.
- योगेश चेऊलकर, ग्राहक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक दुकानात ग्राहकांची लगबग दिसत असून गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा पारंपरिक तसेच पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंना चांगली मागणी असल्याचे दिसत आहे. कुटुंबासोबत बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी दादरमध्ये खरेदी करणे ही आमच्यासाठी दरवर्षीची आनंदाची गोष्ट आहे.
- श्रीकांत शेट्ये, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.