गणरायाच्या स्वागतासाठी नवी मुंबईतील बाजारपेठा गजबजल्या
महागाईवर मात करत खरेदीचा उत्साह, विद्युत रोषणाई अन् पर्यावरणाचा मेळ
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये लाडक्या गणरायाचे आगमन होत असल्याने रविवारी (ता. १३) नवी मुंबईतील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. वाशीतील एपीएमसी फळ-फूल मार्केट, वाशी सेक्टर-९ व १७ च्या बाजारपेठा, नेरूळ, खारघर तसेच पनवेलच्या मुख्य बाजारात सकाळपासूनच नागरिकांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे. वाढत्या महागाईची झळ सोसतही गणरायाच्या स्वागताचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
यंदा कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे तयार मखर आणि सजावटीच्या साहित्यामध्ये १५ ते २५ टक्क्यांनी भाववाढ झाली आहे. महागाईवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांनी पुनर्वापर करता येणाऱ्या आणि पर्यावरणपूरक साहित्याकडे आपला कल वाढवला आहे. कागदाचे आणि पुठ्ठ्याचे आकर्षक मखर, कॉटन व वेलव्हेटची झालर, साड्या व ओढण्यांच्या निऱ्यांपासून तयार केलेले पडदे यांना विशेष पसंती मिळत आहे. सीबीडी, नेरूळ, सीवूड्स, सानपाडा, वाशी सेक्टर ९, तुर्भे मार्केट, एपीएमसी मार्केट, ऐरोली आणि घणसोली या भागात बाजारपेठ भरून गेल्या आहेत. इको-फ्रेंडली साहित्यापासून बनवलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा, लहान घंटा, दीपमाला आणि अष्टविनायकाच्या प्रतिमा असलेल्या लटकन माळांनी बाजारपेठा सजल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी नवी मुंबई पोलिस आणि पालिकेने बाजारपेठांच्या परिसरात विशेष व्यवस्था केली आहे.
अत्याधुनिक विद्युत रोषणाईला मागणी
एलईडी व पिक्सेल लाइट्स : पारंपरिक बल्बऐवजी कमी वीज वापरणाऱ्या एलईडी स्ट्रिप्स, पिक्सेल लाइट्स, मल्टी-कलर फोकस लाइट्स आणि लेझर लाइट्सचा वापर वाढला आहे.
स्मार्ट लाइटिंग: रिमोट आणि मोबाईल ॲपद्वारे रंग बदलणाऱ्या दिव्यांमुळे मखराची आरास अधिक आकर्षक दिसत आहे.
थीम आधारित देखावे : सार्वजनिक मंडळांमध्ये पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर आधारित देखाव्यांसाठी थिमॅटिक बॅकड्रॉप्स आणि थ्रीडी लाइटिंग इफेक्ट्सचा वापर केला जात आहे.
फुलांच्या बाजारात गर्दी
वाशी येथील एपीएमसी छत्रपती शिवाजी महाराज फळ-फूल बाजारात आज पहाटेपासूनच किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती, तर आवक घटल्यामुळे आणि मागणी प्रचंड वाढल्यामुळे झेंडू, शेवंती, निशिगंध, गुलाब आणि अस्टर या ताज्या फुलांचे भाव तेजीत आहेत. पूजेच्या विधीसाठी आवश्यक दुर्वा, शमी पत्री आणि लाल जास्वंदाच्या फुलांची खरेदी नागरिक आवर्जून करत आहेत.
कृत्रिम (आर्टिफिशिअल) फुलांचा वापर
ताजी फुले दोन-तीन दिवसांत सुकतात आणि भावही वाढलेले असतात; त्यामुळे आरास सजावटीसाठी बहुतांश नागरिक सिल्क आणि कापडी कृत्रिम फुलांच्या माळांना पसंती देत आहेत. पूजेच्या मुख्य विधीसाठी ताजी फुले आणि मखराच्या सजावटीसाठी कृत्रिम फुले असा मेळ साधून नागरिक महागाईचा समतोल राखत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.