डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचा लोकल फेऱ्यांसाठी तगादा
खासदार सावरा यांना निवेदन
पालघर, ता. १५ (बातमीदार) : डहाणूहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी सध्याच्या लोकल वेळापत्रकात मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नियमित प्रवाशांना गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. नवीन फेऱ्या सुरू केल्यास प्रवाशांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल. या कारणांमुळे डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासह उमरोळी व वैतरणा रेल्वे स्थानकांवर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याबाबत खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या विविध मागण्या रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे. डहाणू-वैतरणा परिसरातील वाढती लोकसंख्या, मुंबईकडे नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या आणि सध्या उपलब्ध असलेल्या लोकल फेऱ्यांवरील वाढता ताण लक्षात घेता डहाणू लोकलच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ करणे अत्यावश्यक असल्याचे संस्थेने निवेदनात म्हटले आहे.
सकाळ, दुपार आणि संध्याकाळी अतिरिक्त लोकलची मागणी :
डहाणू लोकलच्या फेऱ्या सकाळी, दुपारी तसेच संध्याकाळच्या वेळेत वाढवाव्यात तसेच १५ डब्यांच्या डहाणू लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास अद्याप निश्चित कालावधी उपलब्ध नसल्याने सध्याच्या उपलब्ध पायाभूत सुविधांचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
उमरोळी स्थानकावर तीन गाड्यांना थांबा :
उमरोळी रेल्वे स्थानकावर पुढील गाड्यांना थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
५९०२३/२४ - वलसाड फास्ट पॅसेंजर
६९१७३ - विरार-डहाणू मेमू
६९१७४ - डहाणू-बोईसर मेमू
वैतरणा रेल्वे स्थानकावर १९४२५/२६ नंदुरबार-मुंबई पॅसेंजर या गाडीला थांबा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत उपलब्ध मार्गावर डहाणू लोकलच्या अधिकाधिक फेऱ्या वाढवून प्रवाशांना दिलासा देणे आवश्यक असल्याचेही संस्थेने नमूद केले आहे.
प्रतिक्रिया :
खासदार डॉ. हेमंत सावरा ह्यांनी बैठकीत डहाणू विभागातील समस्या प्रभावीपणे मांडल्या असून, प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की ह्याची प्रचीती येत्या दीपावलीची भेट म्हणून डहाणू लोकलच्या फेऱ्या पश्चिम रेल्वेकडून उपलब्ध केल्या जाऊ शकतात. खासदार आणि पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेकडे सविस्तर असे निवेदन सादर करून डहाणू विभागातील सामन्य नोकरदार रोज उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सहकार्य करावे.
- दयानंद पाटील,
सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.