सहकार चळवळ बळकट करणार!
एनसीयूआयच्या माध्यमातून प्रशिक्षण, डिजिटायझेशनवर भर ः दरेकर
मुंबई, ता. १५ : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या (एनसीयूआय) माध्यमातून राज्यातील सहकाराला योगदान देण्याचा प्रयत्न करू, असे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशनच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०२६ सोहळ्यात सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी झालेल्या या सभेस दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, उपाध्यक्षा वैशाली आवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी दरेकर म्हणाले, की या व्यवस्थेत खूप काही करणे गरजेचे आहे. अडचणीत असलेल्या छोट्या नागरी सहकारी बँकांसाठी माझ्या विनंतीनंतर राज्य सरकारच्या समितीने २०० कोटींची शिफारस केली आहे. त्या समितीच्या शिफारशी सरकारने मान्य कराव्यात, असा प्रामाणिक प्रयत्न मी करेन. तसेच अडचणीतील अर्बन बँकांना ताकद, ऊर्जितावस्था देणे यासाठी फेडरेशनने गतीने काम करावे.
आ. दरेकर पुढे म्हणाले, की १०७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण देण्याचे कामही ठप्प होते. त्याचे अध्यक्षपद मला दिल्यानंतर आपण डिजिटायझेशन करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने तो संघ पुनरुज्जीवित करीत आहोत. आता राज्यातील सहकार चळवळीला प्रशिक्षण देऊन गती देण्याचे कामही सहकारी संघ करीत आहे.
केंद्रात आपले सरकार असताना अमित शहा यांनी सहकार खाते हातात घेतल्यावर देशात सहकार वाढायला लागला. शहा यांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल करून सहकारी व्यवस्था बळकट करण्याचे काम होत आहे. आपल्या राज्याने इतर राज्यांना सहकारात दिशा दिली. पण आपल्याकडे अर्बन बँकिंग व्यवस्था अडचणीत असून, त्यावर विचार करणे गरजेचे आहे. एनसीयूआयच्या संचालकपदी माझी निवड झाली आहे. त्या माध्यमातून राज्यातील सहकाराला, शिक्षण संस्थांना प्रशिक्षणाच्या दृष्टीने काही करता येईल का, यासाठी प्रयत्नशील राहून राज्याच्या सहकाराला दिशा देऊ, असा विश्वासही दरेकरांनी या वेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.