जलपर्णीच्या विळख्यातून वडाळे तलावाचा श्वास मोकळा
पनवेल महापालिकेचा ५० हजार जैविक मित्रांसह पर्यावरणपूरक लढा
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १५ ः शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक वडाळे तलाव गेल्या काही काळापासून दक्षिण अमेरिकेतून आलेल्या सॅल्विनिया मोलेस्टा या उपद्रवी जलपर्णीच्या विळख्यात सापडला होता. तलावाचे सौंदर्य आणि जलचरांचा श्वास गुदमरणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी पनवेल पालिकेने रासायनिक किंवा यांत्रिक साधनांचा वापर न करता निसर्गाच्या सहाय्यानेच बायोलॉजिकल कंट्रोल (जैविक नियंत्रण) हा वैज्ञानिक व क्रांतिकारक प्रयोग हाती घेतला आहे.
महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या संकल्पनेतून आणि आयसीएआर-खरपतवार संशोधन संचालनालय जबलपूर यांच्या तांत्रिक सहकार्याने वडाळे तलावात ‘सायर्टोबॅगस साल्विनी’ या विशिष्ट जैविक कीटकांची फौज तैनात केली आहे. काही महिन्यांपूर्वी, म्हणजे ७ मे रोजी या प्रयोगाचा पहिला टप्पा पार पडला, यामध्ये २० हजार कीटक तलावात सोडण्यात आले होते. या कीटकांनी तलावातील अनुकूल वातावरणात केवळ स्वतःचे प्रजनन वाढवले नाही, तर सॅल्विनिया जलपर्णीवर हल्ला चढवून तिची वाढ रोखण्यास सुरुवात केली. या मोहिमेला अधिक गती देण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ ला दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० हजार कीटक तलावात सोडण्यात आले आहेत.
काय आहे या कीटकांचे वैशिष्ट्य?
सायर्टोबॅगस साल्विनी हे कीटक केवळ आणि केवळ सॅल्विनिया जलपर्णीवरच उपजीविका करतात. त्यामुळे तलावातील इतर वनस्पती, लहान मासे किंवा इतर जलचरांना या कीटकांचा कोणताही धोका नाही. रासायनिक फवारणीमुळे पाणी प्रदूषित होते आणि मासे मरतात, परंतु ही बायोलॉजिकल कंट्रोल (जैविक नियंत्रण) पद्धत संपूर्णपणे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहे. तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रवास उपयुक्त उपाययोजनांमुळे तलावाच्या आरोग्यात टप्प्याटप्प्याने सकारात्मक बदल घडतील.
जैवविविधतेचे संवर्धन आणि नवे जीवन
जलपर्णीच्या दाट थरामुळे तलावातील सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जैविक प्रयोगामुळे तलावातील पाण्याचे नैसर्गिक अभिसरण पुन्हा पूर्ववत होणार आहे. पाण्यातील विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने मासे आणि इतर जलचरांचे आयुष्य सुरक्षित होईल. तलाव स्वच्छ आणि मोकळा झाल्यावर हिवाळ्यात येणाऱ्या देशी-विदेशी पक्ष्यांना पुन्हा एकदा हक्काचा अधिवास मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.