प्रशासकीय निष्काळजीचा स्फोट!
खासगी रुग्णालयांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ ः निवासी इमारतींमधील बेकायदा व्यावसायिक उपक्रम, सुरक्षेच्या नियमांना धाब्यावर बसवून चालवली जाणारी खासगी रुग्णालये आणि नवी मुंबई पालिकेच्या गलथान कारभारामुळे अवघी नवी मुंबई सध्या फायर बॉम्बवर बसली आहे. शहरातील ३० पेक्षा अधिक रुग्णालयांची अग्निशमन प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत. सानपाडा सेक्टर-१ मधील प्रतीक गृहनिर्माण संस्थेत १५ सप्टेंबर रोजी झालेला भीषण एलपीजी गॅस स्फोट ही केवळ एक दुर्घटना नसून, प्रशासकीय व व्यापाऱ्यांच्या निष्काळजीचा जिवंत पुरावा आहे.
सानपाडा येथे दुकानात झालेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे शहरातील इमारतींच्या अग्निशमन प्रमाणपत्राचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील निवासी व व्यावसायिक इमारतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. शहरातील अनेक इमारतींसह खासगी रुग्णालयांमध्ये प्रलंबित असलेले फायर ऑडिट यामुळे नागरी सुरक्षेपुढील आव्हाने अधोरेखित झाली आहेत. व्यावसायिक नफ्यासाठी इमारत आराखड्यात केले जाणारे अनधिकृत बदल आणि अग्निशमन यंत्रणेच्या नियमांचे होणारे उल्लंघन यांमुळे अनेक इमारती आणि रुग्णालये धोकादायक बनली आहेत. नवी मुंबई क्षेत्रातील इमारती आणि रुग्णालयांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने आणि कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, निवासी इमारतींच्या तळमजल्यावर चालणाऱ्या सर्व व्यावसायिक आस्थापनांमधील गॅस सिलिंडर्सची सुरक्षा आणि गॅस डिटेक्टर यंत्रणा अनिवार्य करण्यात यावी. ज्या खासगी रुग्णालयांनी मंजूर आराखड्यात अनधिकृत फेरफार केले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म बी प्रलंबित आहे, त्यांना निश्चित मुदतीत त्रुटी दूर करण्याचे निर्देश देऊन अन्यथा त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द केला पाहिजे. तसेच, सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक इमारतींमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया गतिमान करून महापालिकेने नियमित फायर ऑडिटचे डिजिटल सार्वजनिक ट्रॅकिंग सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे.
संस्थात्मक त्रुटी, धोरणात्मक आव्हाने आणि नागरी सुरक्षेचे भवितव्य
निवासी इमारतींच्या तळमजल्यावर व्यावसायिक उपक्रमांना विशेषतः हॉटेल्स आणि स्नॅक्स सेंटर्सना परवाने देताना एलपीजी गॅस सुरक्षिततेची नियमित तपासणी न होणे ही मोठी समस्या आहे. मॉलसारख्या व्यावसायिक संकुलांमध्ये चालणाऱ्या रुग्णालयांमध्ये नवजात बालके व माता यांसारख्या असहाय्य रुग्णांची उपस्थिती असताना अग्निसुरक्षा मार्गात अडथळे निर्माण करणे हे अत्यंत निष्काळजीचे लक्षण आहे.
क्लॉऊड नाईन रुग्णालय (वाशी) : पाम बीच गॅलेरिया मॉलमध्ये चालणाऱ्या या रुग्णालयात नवजात बालके व मातांचा जीव धोक्यात घालून मंजुरीशिवाय फेरफार केले गेले. आपत्कालीन कॉरिडॉर बंद करून तेथे केबिन बांधल्या, दरवाजे दोन्ही बाजूंनी उघडत नाहीत, स्वतंत्र आपत्कालीन जिना काढला आहे, परंतु नियमानुसार अंतर सोडलेले नाही. नियमानुसार पूर्तता नसल्याने महापालिकेने परवानगी दिलेली नसतानाही बेकायदा रुग्णालय चालवण्यात येत आहे.
सुरक्षेचा कागदी खेळ : शहरातील सद्यःस्थिती
वर्गवारी / संस्था प्रकार - संख्या / आकडेवारी - प्रशासकीय व कायदेशीर स्थिती
अतिधोकादायक इमारती (सी-१) - ५१३ ते ५२७ वास्तव्यासाठी अयोग्य; मोकळे करण्याचे आदेश कागदावरच
३० वर्षांहून जुन्या इमारती - ५०० पेक्षा जास्त - कलम २६५(अ) नुसार ऑडिट बंधनकारक; अंमलबजावणी शून्य
त्रुटी आढळलेली रुग्णालये - ३० पेक्षा अधिक - विनापरवाना फेरफार आणि प्रलंबित फायर एनओसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.