गणेशोत्सवानिमित्त दादर फूल बाजारात गर्दी
फुले, हार, दुर्वा खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड
सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १५ (बातमीदार) ः गणेश चतुर्थीनिमित्त घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींच्या सजावटीसाठी लागणारी विविधरंगी फुले, आकर्षक पुष्पहार, दुर्वा, दुर्वांच्या कंठ्या इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून दादरच्या फूल बाजारात मुंबईकरांची मोठी गर्दी झाली होती. यंदा फुले महागली असली तरी खरेदीदारांचा उत्साह कायम असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे वाजतगाजत आगमन झाले आहे. सोमवारी (ता. १४) घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली असून, रविवारपासून फुले व पूजासाहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती.
यंदा विविध प्रकारच्या फुलांच्या भावात मोठी वाढ झाल्याने गणेशभक्तांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. फुलांच्या वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत असले तरी गणरायाच्या स्वागतासाठी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी कायम आहे. गणेशोत्सव काळात बाजारात आणखी गर्दी होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
गणेश चतुर्थीसाठी फुले आणि हार घेणे आवश्यक आहे. यंदा जवळपास प्रत्येक फुलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.
- अर्चना घाटविसवे, ग्राहक
गणेशोत्सव काळात फुलांचे घाऊक दर वाढले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ विक्रीच्या दरावर झाला आहे. पाऊस सुरू असतानाही ग्राहकांची गर्दी चांगली आहे.
- हर्षदा थळे, फूलविक्रेते
फुलांचे दर
झेंडू - ६० रुपये किलो
मोगरा - ६००-८०० रुपये किलो
गुलाब - १००-१२० रुपये किलो
शेवंती - ८०-१०० रुपये किलो
गुलाब मिरॅकल - १२०-१५० रुपये किलो
लिली - १००-४०० रुपये किलो
चाफा - (१०० नग) १५० रुपये
जास्वंदी - (१०० नग) १०० रुपये
तुळस - १ जुडी रुपये २०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.