सावरसई गावाची ‘एक गाव एक गणपती’ परंपरा कायम
स्थापनेला २४ वर्षे पूर्ण होत विसर्जनाला डीजेऐवजी भजनाची साथ
पेण, ता. १५ (वार्ताहर) : जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सावरसई गावाने गेल्या २४ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ ही सामाजिक एकतेची परंपरा यशस्वीपणे जपली आहे. सध्या सर्वत्र डीजे संस्कृतीचा बोलबाला असताना, सावरसई गावाने सुरुवातीपासूनच डीजेला फाटा देत विसर्जनाच्या वेळी भजनाची पारंपरिक साथ कायम ठेवली आहे. त्यामुळे या गावाचा गणेशोत्सव संपूर्ण परिसरात आदर्श मानला जात आहे.
पूर्वी सावरसई गावाची आर्थिक परिस्थिती बेताची होती, छोटी घरे होती आणि प्रत्येक जण आपापल्या घरी गणपती बसवत असे, मात्र यातून आपसातील संवाद कमी होऊ नये आणि संपूर्ण गाव एकत्र राहावे, या उद्देशाने तत्कालीन सरपंच महादेव दिवेकर यांनी गावामध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सुरू केली. आजच्या युवा पिढीने ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. चंद्रकांत दिवेकर, भगवान सावंत, सागर सावंत, माजी पंचायत समिती सदस्य नीलकंठ दिवेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश दिवेकर यांच्यासह सर्व ग्रामस्थ या महोत्सवासाठी एकत्र येतात.
डीजेऐवजी भजनाची साथ
गणेशोत्सवाच्या दररोज भजन, कीर्तन, ग्रामस्थांचे एकत्र जेवण, नाचगाणी तसेच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत, तर पाच दिवस असणाऱ्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाला गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येत भजनाच्या निनादात बापदेव तलावात गणपतीचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले जाते. त्यामुळे सावरसईने ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा आजवर जपली आहे.
सावरसई गावाच्या गणेशोत्सवाला २४ वर्षे पूर्ण होत असताना आमची संस्कृती आम्ही जपून ठेवली आहे. या गावात ‘एक गाव एक गणपती’ बसविण्याची सुरुवात केली असून, आता गावातील सर्व तरुण पिढी यासाठी एकत्र झटत आहेत. एका संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत येथे मंदिर बांधून दिले. या मंदिरात गणपती बसत असून, पुढील वर्षी २५ वर्षे होत असल्याने यापेक्षाही अधिक सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस आहे. पाच दिवसांनंतर गणपती विसर्जन होत असताना डीजे वाद्य न लावता आजवर भजन संस्कृतीची जपणूक ठेवली आहे.
- महादेव दिवेकर, माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.