सात बेटांपासून आधुनिक मुंबईपर्यंत
घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून अतुल खुळे यांनी उलगडला मुंबईचा समृद्ध प्रवास
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः सात बेटांपासून सुरू झालेला प्रवास, कष्टकरी मुंबईकरांच्या घामातून उभी राहिलेली महानगरी, संकटांवर मात करीत पुन्हा उभे राहण्याची जिद्द आणि उत्सवांमधून धडकणारा मुंबईचा आत्मा... मुंबईच्या याच समृद्ध प्रवासाचे दर्शन घाटकोपर-बर्वेनगर येथील अतुल खुळे यांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या सजावटीतून घडविले आहे.
मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहीम, कुलाबा आणि छोटा कुलाबा या सात बेटांपासून आधुनिक मुंबईपर्यंतचा प्रवास सजावटीत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, मुंबई महापालिका, मरीन ड्राइव्ह, राणी बाग, लोकल, डबेवाला यांसह मुंबईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचे विविध पैलू यात पाहायला मिळतात. मुंबईवर आलेली संकटे आणि त्यातून मुंबईकरांनी दाखविलेली माणुसकीही या सजावटीचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर दहीहंडीचे मानवी मनोरे, गणेशोत्सवाचा जल्लोष आणि नवरात्रोत्सवाची ऊर्जा यांतून मुंबई म्हणजे जिद्द, माणुसकी आणि उत्सव हा संदेश देण्यात आला आहे.
अतुल खुळे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि वैचारिक विषयांवर घरगुती सजावट सादर करीत आहेत. त्यांच्या कल्पक सजावटींना विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. यंदाची मुंबईच्या प्रवासावर आधारित सजावटही परिसरातील गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबई थांबत नाही; कारण तिच्या प्रत्येक श्वासात संघर्ष, माणुसकी आणि उत्सवाची ऊर्जा आहे, असा संदेश या सजावटीतून देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.