गणेशोत्सवात सुपाचे महत्त्व आजही टिकून
सणासुदीच्या काळात बांबूच्या सुपांना विशेष मागणी; बुरुड व्यावसायिकांना आर्थिक आधार
पोलादपूर, ता. १६ (बातमीदार) : गणेशोत्सवामध्ये कोकणात गौरी पूजनाला विशेष महत्त्व असून, पूजनासाठी बांबूच्या सुपांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे बुरुड व्यावसायिक आणि व्यापारीवर्गाला सणासुदीच्या काळात आर्थिक गती मिळत आहे.
बांबूपासून तयार केलेले सूप हे ग्रामीण संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले आहे. गौरी पूजनानिमित्ताने नवीन सुनेला तसेच घरातील महिलांना सूप देण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही जपली जाते. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर सुपांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा सुपांना चांगली मागणी असल्याने स्थानिक व्यावसायिकांसह घाटमाथ्यावरील सूप विक्रेतेही पोलादपूर, महाड परिसरात दाखल झाले आहेत. बाजारात सुपांची साधारण १०० ते १८० रुपये दराने विक्री होत आहे. महाडमध्ये स्थानिक बुरुड व्यावसायिकांसह भोर परिसरातील सूप विक्रेते तसेच मुंबई आणि पुणे येथील घाऊक बाजारातून मोठ्या प्रमाणात सूपे विक्रीसाठी दाखल झाली आहेत.
२५ हजारांहून अधिक सूपे विक्रीसाठी दाखल
अनुराधा नक्षत्रावर गुरुवारी गौरी आवाहन, तर शुक्रवारी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन करण्यात येणार आहे. या पूजेसाठी सुवासिनी महिलांमध्येही सुपाची मागणी वाढली असून, बाजारात विविध आकारांच्या सूपे उपलब्ध झाली आहेत. पोलादपूरमध्ये ५३०, तर महाडमध्ये १,८०१ ठिकाणी गौरीचे आगमन व पूजन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात जवळपास २५ हजारांहून अधिक सूपे विक्रीसाठी दाखल झाली होती. यापैकी बहुतांश सुपांची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
मोठ्या आकाराच्या सुपांना विशेष मागणी
रोहा (बातमीदार) ः सूप व्यावसायिक व विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या आकाराच्या सुपांना विशेष मागणी असून, त्यांची किंमत १०० ते १८० रुपये, तर लहान सुपांची किंमत ८० ते १०० रुपये आहे. खास वेणीची डिझाइन असलेले सूप हे २०० ते ३०० रुपयांपर्यंत विकले जात असल्याचे दिसून येत आहे.
फोटो कॅप्शन : गौरी गणपती सणाच्या निमित्ताने बाजारात सूप आणि सुपल्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.