सोनेरी प्रकाशात उजळली आशेची नवी मुंबई
बाल कर्करोगाविरुद्धच्या लढ्याला ‘गो गोल्डन’चा भक्कम आधार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : सप्टेंबर महिन्यातील बाल कर्करोग जनजागृती महिन्याचे औचित्य साधून बेलापूर येथील नवी मुंबई पालिकेची वास्तू सोनेरी रंगाच्या लखलखत्या रोषणाईने उजळून निघाली. ॲक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशनच्या पुढाकाराने १२ सप्टेंबरला साकारलेली ही गो गोल्डन रोषणाई बाल कर्करोगाबाबत समाजात संवेदनशीलतेचा आणि आशेचा संदेश देऊन गेली.
सप्टेंबर महिना हा जगभरात बाल कर्करोग जनजागृती महिना म्हणून पाळला जातो आणि या लढ्याचे आंतरराष्ट्रीय प्रतीक म्हणून सोनेरी रंगाचा वापर केला जातो. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या बालकांचे असीम धैर्य, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पालकांचा संघर्ष आणि या आजारामुळे जीव गमावलेल्या निष्पाप बालकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यास बाल कर्करोगाचे ७० ते ९० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. मात्र, भारतात हे प्रमाण अवघे ४० ते ४५ टक्के इतकेच आहे. जनजागृतीचा अभाव, उपचारास होणारा उशीर आणि अपुऱ्या सहाय्य व्यवस्था ही यामागील प्रमुख कारणे आहेत. हीच दरी मिटवण्यासाठी आणि बालकांच्या उपचारांचे सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठी ॲक्सेस लाइफ संस्था कार्यरत आहे.
‘ॲक्सेस लाइफ’चा भक्कम पाठिंबा
कर्करोग हा आजार योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो, याबद्दल आजही समाजात पुरेशी माहिती नाही, असे ॲक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशनचे संस्थापक गिरीश नायर यांनी नमूद केले. नवी मुंबईकरांच्या जवळच्या वास्तूला सोनेरी रोषणाई केल्याने नागरिकांचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले जाते आणि त्यांना मदतीचा हात पुढे करण्याची प्रेरणा मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असणारी ही संस्था मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालय व इतर सरकारी रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या अत्यंत गरजू कुटुंबांना मोफत व स्वच्छ निवास, पौष्टिक आहार, वाहतूक, शिक्षण आणि समुपदेशन अशा सर्वांगीण सुविधा पुरवते. सध्या देशातील ११ शहरांमध्ये संस्थेचे कार्य विस्तारले असून, लवकरच तिरुवनंतपुरम येथे १५वे केंद्र सुरू होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.