एपीएमसीच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य
दुर्गंधीने व्यापारी, कामगार आणि ग्राहक त्रस्त
जुईनगर, ता. २० (बातमीदार) : एपीएमसी परिसरात सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. तुर्भे स्थानक रोडवरील जनता मार्केट आणि एमटीएनएल कार्यालयाच्या लगत असलेल्या एपीएमसी फळ बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. कचऱ्याची वेळेवर उचल होत नसल्याने सडलेल्या फळे-भाजीपाल्यातून सुटणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे व्यापारी, हमाल, कामगार, वाहतूकदार आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत.
एपीएमसीच्या फळ, भाजीपाला आणि इतर बाजारपेठांमध्ये दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. त्याचबरोबर शेकडो व्यापारी, कामगार, हमाल, वाहतूकदार आणि मालवाहतूक करणारे चालक या परिसरात दिवसभर कार्यरत असतात. अशा महत्त्वाच्या व्यावसायिक परिसरातच कचऱ्याचे ढीग साचल्याने स्वछता विभाग आणि बाजार समितीच्या स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फळे व भाजीपाल्याचा सडलेला कचरा, प्लास्टिक तसेच इतर टाकाऊ वस्तूंमुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने त्याचे ढीग वाढत असून, त्यातून येणारी दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत आहे.
दुकानांच्या आणि बाजारपेठेच्या आसपासच कचरा साचल्याने ग्राहकांना या भागातून जाणेही त्रासदायक होत आहे. दुर्गंधीमुळे ग्राहक बाजारपेठेत येण्याचे टाळत असल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याची नाराजी काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दिवसभर याच परिसरात काम करणाऱ्या हमाल, कामगार आणि वाहनचालकांनाही दुर्गंधीयुक्त वातावरणाचा सामना करावा लागत आहे.
डास, माश्यांचा वाढता प्रादुर्भाव
कचऱ्याचे ढीग दीर्घकाळ पडून राहिल्याने डास, माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सडलेल्या कचऱ्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसराची स्वच्छता करावी, तसेच आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण आणि कीटकनाशक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील मुख्य बाजारपेठेतच अशी बिकट अवस्था असेल, तर पालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. लवकरात लवकर यावर योग्य कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संबंधितांनी दिला आहे.
- दत्तात्रेय काळे, सरचिटणीस, मनसे वाहतूक सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.