विद्याविहारच्या विघ्नहर्त्याला ‘नवसाचा धागा’
मनोकामना पूर्ण होण्यासाठी भाविकांकडून श्रद्धेने धागा बांधण्याची परंपरा
घाटकोपर ता. १७ (बातमीदार) : गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा आणि उत्साहाचा उत्सव नसून, लाखो भक्तांच्या श्रद्धा आणि भावनेचा सोहळा आहे. याच श्रद्धेची अनोखी प्रचीती विद्याविहार येथील ओम साई मित्रमंडळाच्या ‘विद्याविहारचा विघ्नहर्ता’ गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. मंडळाने यंदा ‘एक धागा नवसाचा’ या संकल्पनेतून भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा धागा बाप्पाशी जोडला आहे.
मंडळाचे मुख्य मार्गदर्शक माजी मंत्री प्रकाश महेता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष सागर नलावडे, उत्सवप्रमुख सचिन पवार यांच्या पुढाकाराने यंदा गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवस पूर्ण व्हावा, मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी अनेक भाविक गणरायाच्या हाताला श्रद्धेने नवसाचा धागा बांधतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी हा धागा गणरायासोबत विसर्जित करण्याची परंपरा मंडळाकडून जपली जाते.
नवस पूर्ण झाल्यानंतर आपल्या इच्छेनुसार गणरायाच्या चरणी सोने-चांदी किंवा अन्य वस्तू अर्पण करण्याची प्रथा अनेक भक्त पाळतात. त्यामुळे ‘एक धागा नवसाचा’ हा उपक्रम भाविकांसाठी श्रद्धा, विश्वास आणि कृतज्ञतेचे प्रतीक ठरत आहे. यंदा मंडळाने एअर कंडिशन मंडप उभारला आहे. तसेच मंडपात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, फायर सेफ्टी उभारण्यात आले आहे. एक धागा नवसाचा या संकल्पनेतून भक्तांच्या मनातील श्रद्धेला गणरायाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, नवसाचा धागा हा केवळ धागा नसून, भक्ताच्या मनातील विश्वासाचे प्रतीक आहे, अशी भावना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
२३ फूट उंच मूर्ती
यंदाच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २३ फूट उंच असलेली भव्य मूर्ती. मूर्तीच्या सजावटीमध्ये स्वामी समर्थांची प्रतिमा असलेले चित्र साकारण्यात आले असून, त्यामुळे गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधले जात आहे. भव्य मूर्ती, आकर्षक सजावट आणि नवसाच्या धाग्याशी जोडलेली श्रद्धेची संकल्पना यामुळे ‘विद्याविहारचा विघ्नहर्ता’ भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.