अनधिकृत कमानींमुळे पालिकेचा महसूल बुडीत?
राजकीय पुढारी, व्यावसायिकांच्या जाहिरातींचा बोलबाला; वाहतुकीलाही अडथळा
पनवेल, ता. १७ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर बेसुमार अनधिकृत कमानी दिसत आहेत. राजकीय पुढारी आणि मोठ्या प्रमाणात वर्गणी देणाऱ्या व्यावसायिकांचे फोटो व जाहिराती असलेल्या या कमानी उभारताना महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
पनवेल पालिका क्षेत्रात जवळपास ४०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रत्येक मंडळाकडून गणेशोत्सवाच्या कालावधीत साधारणपणे तीन ते पाच कमानी उभारल्या जातात. या कमानींवर राजकीय नेते, पदाधिकारी आणि व्यावसायिकांच्या जाहिरातींसह त्यांची नावे व छायाचित्रे लावण्यात येतात. दरम्यान, या कमानी उभारण्यापूर्वी आवश्यक परवानगी घेतली जाते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेकडून दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर अनधिकृत बॅनर व जाहिरात फलक हटविण्याची मोहीम राबविली जाते. मात्र, गणेशोत्सव काळात उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत कमानींवरही वेळेत कारवाई करून नियमांचे पालन सुनिश्चित करण्याची गरज आहे. महसुलाचे नुकसान टाळण्याबरोबरच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रस्त्याची रुंदी होते कमी
रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या कमानींच्या दोन्ही बाजूंना किमान दीड ते दोन फूट भाग रस्त्यावर येत असल्याने रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी कमी होते. परिणामी, वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि वाहने रस्त्यावर येत असल्याने अशा कमानींमुळे कोंडीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. तसेच फलकामुळे वळण घेताना समोरील वाहने दिसून न आल्याने अपघाताची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.