सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : मुंब्रा आणि दिव्यातील नागरिकांकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि वाढत्या पाणीटंचाईच्या तक्रारींचा पाढा वाचला जात असताना, महापालिकेने अनधिकृत जोडण्यांवर कारवाईचा बडगा उगारत थेट जोडण्या खंडित करण्यात येत आहेत. मागील नऊ दिवसांत पालिकेकडून सुमारे ६० जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तर संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने अनधिकृत पाणीउपशाला लगाम लागेल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने ८ सप्टेंबरपासून ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. कल्याण फाटा ते वाय जंक्शन आणि पुढे मुंब्रा अग्निशमन दलापर्यंतच्या मुख्य जलवाहिन्यांवरील अनधिकृत जोडण्यांचा शोध घेऊन त्या खंडित करण्याचे काम सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या धडक कारवाईमुळे मुख्य जलवाहिन्यांवरील अनधिकृत पाणीउपशाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कल्याण फाटा ते वाय जंक्शनपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत जोडण्यांप्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकारी, अभियंते आणि मोठ्या पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात येत आहे.
मुंब्रा-दिव्यातील नागरिकांना पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा तसेच मुख्य जलवाहिन्यांमधील अनधिकृत पाणीउपसा रोखला जावा, यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. ८ सप्टेंबरला १६ आणि ११ सप्टेंबरला १५ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. बुधवारी झालेल्या कारवाईसह आतापर्यंत एकूण ६० अनधिकृत जोडण्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कारवाईत उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंते शशिकांत साळुंके व अतुल कुलकर्णी, उपअभियंते सुरेश वाघेरे व गुणवंत पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंते आणि कर्मचारी कारवाईत सहभागी झाले आहेत.
दिव्यात २०, मुंब्र्यात नऊ जोडण्यांवर कारवाई
बुधवारी झालेल्या कारवाईत दिवा विभागातील भोलेनाथनगर नाला परिसरातील १३, गुलिस्तान हॉटेल नाला येथील सहा आणि शिळगाव मंदिर परिसरातील एक अशा २० अनधिकृत नळजोडण्या तोडण्यात आल्या. मुंब्रा विभागात मित्तल ग्राउंड नाला परिसरातील सात आणि ग्लोबल नाला येथील दोन जोडण्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे एका दिवसात २९ जोडण्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.
२४ तास क्लॉकमन तैनात
खंडित केलेल्या जोडण्या पुन्हा जोडल्या जाऊ नयेत, यासाठी महापालिकेने कडक उपाययोजना आखल्या आहेत. वारंवार अनधिकृत जोडण्या आढळणाऱ्या ठिकाणी २४ तास क्लॉकमन तैनात करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पोलिस बंदोबस्त वाढविणे आणि प्लंबर कर्मचारी व सुरक्षा रक्षकांमार्फत नियमित गस्त घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.