ओएनजीसीविरोधात कामगारांचा एल्गार
आज सायंकाळी बैठकीसाठी आमंत्रण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
उरण, ता. १७ (बातमीदार) : वर्षानुवर्षे ओएनजीसीच्या कामाचा गाडा हाकणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर कपातीची कुऱ्हाड चालविल्याने न्हावा सप्लाय बेसवर संतापाचा भडका उडाला आहे. या अन्यायकारक कपातीविरोधात कंत्राटी कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून, स्थानिक आणि महिलांनीही या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला आहे. ‘न्याय हा हक्क आमचा आहे, भीक नाही’ असा नारा देत कामगारांनी प्रशासनाविरोधात आरपारच्या लढ्याचा इशारा दिला आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून कामगार कपात थांबविण्याबाबत ओएनजीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष बैठका घेण्यात आल्या, मात्र ठोस तोडगा निघाला नाही, असा आरोप कामगारांनी केला आहे. त्यातच ३१ ऑगस्टपासून तब्बल २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या १७ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी ओएनजीसी विभागातील पाच कामगारांना बडोदा येथे पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांकडून देण्यात आली आहे.
या वेळी अध्यक्ष राजेश घरत, सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेश पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, हनुमान भोईर, आशीष पाटील, रवींद्र पाटील, राजेश म्हात्रे, गणेश पाटील, संजय ठाकूर, प्रदीप ठाकूर, चेतन कडू, रमेश भोईर, प्रीतम पाटील, राकेश पाटील, विशाल पाटील, नवनाथ म्हात्रे, अजय पाटील, जयंत पाटील, नीलेश भोईर, गौतम गायकवाड, जगन्नाथ मोरे, सुशांत बोंद्रे, समाधान म्हात्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काम आमचे, घाम आमचा; मग रोजगार गुजरातला का?
न्हावा सप्लाय बेसमधील पाईप व इतर महत्त्वाचे साहित्य सुमारे ४०० हून अधिक ट्रेलरद्वारे गुजरातमधील पिपावाव येथे नेण्यात आल्याचा दावा कामगारांनी केला आहे. स्थानिकांच्या घामावर उभ्या राहिलेल्या प्रकल्पातील रोजगार गुजरातला का वळवला जात आहे, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. न्हावा सप्लाय बेसचे भवितव्य आणि स्थानिक कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.