दिव्यांगांकडे पाहण्याची
दृष्टी बदलण्यासाठी ‘ॲज आय ॲम’
वास्तव जीवनाचे चित्रण; चळवळीची घोषणा
मुंबई, ता. १८ : दिव्यांगत्वाकडे पाहण्याची भारताची दृष्टी बदलण्याच्या उद्देशाने ‘द असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसॅबिलिटी’ (एपीडी) या संस्थेने ‘ॲज आय ॲम’ या राष्ट्रीय छायाचित्रण आणि चित्रफिती चळवळीची घोषणा केली आहे.
भारतातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि जाहिरातींमध्ये ज्या पद्धतीने सादर केले जाते, त्याला आव्हान देत त्यांच्या वास्तव, दैनंदिन आणि बहुआयामी आयुष्याचे चित्रण करण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे. भारतात पाच कोटींहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत; मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि जाहिरातींमध्ये त्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित राहिले आहे. त्यांचे चित्रण झाले तरी ते बहुतांश वेळा दया किंवा ‘प्रेरणादायी’ अशा चौकटीतून केले जाते. हीच दृश्य प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न ‘ॲज आय ॲम’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
देशभरातील छायाचित्रकार, चित्रफिती निर्माते आणि दृश्य-कथाकारांनी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनातील सामान्य, आनंदी आणि विविध पैलू टिपण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. या माध्यमातून भविष्यातही उपयोगी ठरेल, असा कायमस्वरूपी दृश्यसंग्रह तयार करून भारत दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्यात बदल घडवून आणण्याचे ‘ॲज आय ॲम’चे उद्दिष्ट आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. विजेत्यांची घोषणा ३ डिसेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिना’निमित्त करण्यात येईल. ‘सर्वोत्कृष्ट प्रवेशिका’, ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दृश्य-कथाकार’ आणि ‘दिव्यांगत्व असलेला सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार’ अशा तीन श्रेणींमध्ये रोख व अन्य पुरस्कार दिले जातील. पुरस्कारांसह परीक्षक मंडळातील सदस्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन सत्रांचा लाभ मिळेल. तसेच, कायमस्वरूपी रॉयल्टीसह जागतिक स्तरावरील स्टॉक इमेज लायब्ररीमध्ये प्रवेश, महत्त्वाच्या सार्वजनिक प्रदर्शनामध्ये स्थान, राष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्धी आणि ‘सर्टिफाइड डिसॅबिलिटी-सेंसिटिव्ह व्हिज्युअल स्टोरीटेलर’ म्हणून एपीडीचे औपचारिक प्रमाणपत्र अशा संधीही विजेत्यांना मिळतील.
‘ॲज आय ॲम’साठी चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक आर. बाल्की, छायाचित्रण दिग्दर्शक संतोष सिवन, बीबीडीओ इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य सर्जनशील अधिकारी जोसी पॉल, निर्वाणा फिल्म्सच्या संस्थापक स्नेहा आयपे, भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी जोशी, चित्रपट दिग्दर्शक आणि दृश्य कलाकार ईशान नायर, ‘नो डिसॅबिलिटी’चे संस्थापक मोहित आहुजा आणि इंडियन स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीचे सहसंस्थापक लुईस मिरांडा यांचा समावेश असलेले नामवंत परीक्षक मंडळ तयार करण्यात आले आहे. ‘तनिष्क’ने या मोहिमेसाठी प्रमुख प्रायोजक म्हणून, तर अझीम प्रेमजी फाउंडेशनने प्रमुख पाठीराखे म्हणून सहभाग घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.