माहेरवाशीण गौराईचे घरोघरी भक्तिभावाने पूजन
पारंपरिक वेशभूषा, फुलांची सजावट; ओवशाच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे जतन
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) ः गणरायाच्या आगमनानंतर माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौराईचे पूजन शुक्रवारी (ता. १८) नवी मुंबई, पनवेल यासह परिसरातील गावठाणांत भक्तिभावाने पार पडले. पूजनासाठी महिलांनी पहाटेपासूनच घराची स्वच्छता, आकर्षक सजावट आणि नैवेद्याची तयारी केली होती.
गौराईच्या स्वागतासाठी घरांची आकर्षक फुलांनी सजावट केली होती. दागिने, मोत्याची नथ आणि पारंपरिक वेशभूषेतील गौराईचे मनोहरी रूप अनेक घरांत पाहायला मिळाले. सुवासिनींनी गौराईचे औक्षण करून विधिवत पूजन केले. माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचा पाहुणचार आपल्या लेकीप्रमाणे करण्याची भावना या सोहळ्यातून दिसून आली. पूजनानिमित्त घराघरांत विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ आणि पारंपरिक नैवेद्य तयार करण्यात आला.
जुन्या लोकगीतांचे सूर
अनेक गाव-गावठाणांत गौराईभोवती पारंपरिक फेऱ्या धरून महिलांनी जुन्या लोकगीतांचे सूर आळवले. ‘सरला श्रावण भादवा, आला गौराई माझी गेली पाण्याला..., सुपली सोन्याची... अशा पारंपरिक गीतांनी परिसर दुमदुमून गेला. ढोलाच्या तालावर रंगलेल्या फेऱ्यांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या परंपरेतून आगरी-कोळी समाजाची समृद्ध लोकसंस्कृती आणि पारंपरिक वारसा जपला जात असल्याचे मीनाक्षी रमेश बोस यांनी सांगितले.
ओवशातून सांस्कृतिक परंपरेचे जतन
गौराई पूजनासोबतच अनेक ठिकाणी ओवशाची पारंपरिक पद्धतही श्रद्धेने पार पाडण्यात आली. पाच प्रकारच्या भाज्या, वेलींची पाने, फळे, करंडा-फणी, खण-नारळाची ओटी आणि सुटे पैसे अशा साहित्याने भरलेली पाच सूपे गौराईसमोर ठेवण्यात आली. सुहासिनींनी या सुपांची विधिवत पूजा करून गौराईसमोर सूप तीन वेळा वर-खाली फिरवून ओवसा भरण्याची परंपरा जपली. या निमित्ताने नव्या पिढीलाही आगरी-कोळी समाजाच्या पारंपरिक रूढी-परंपरांची ओळख होत असल्याचे चित्र होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.