मुंबई

कशेडी बोगद्यात अंधार

CD

कशेडी बोगद्यात अंधार
प्रकाशयोजना ठप्प; सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष
पोलादपूर, ता. १८ (बातमीदार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा कशेडी बोगदा पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला असला, तरी बोगद्यातील प्रकाशव्यवस्थेची समस्या कायम असल्याचे निदर्शनास येत आहे. दोन्ही समांतर बोगद्यांमध्ये अनेक दिवे बंद असल्याने वाहनचालकांना काही अंतर केवळ वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशात पार करावे लागत आहे. विशेषतः चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या बोगद्यात प्रवेशद्वारापासून मध्यभागापर्यंत तसेच पुढील काही भागात दिवे बंद असल्याचे दिसून येते.
कशेडी घाटातील वळणावळणाचा धोकादायक प्रवास टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे, मात्र दोन किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या या मार्गिकांमध्ये अखंड प्रकाशव्यवस्था आणि प्रभावी वायुवीजनसह सुरक्षेच्या यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाचा अभाव राहिल्यास वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

महामार्गावरील दिव्यांची दुरवस्था
बोगद्याच्या प्रवेशद्वारांपासून बाहेरील सुमारे ५०० मीटरपर्यंतच्या महामार्गावरील पथदिव्यांची स्थितीही समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगावजवळील राष्ट्रीय महामार्ग परिसरात सेवा रस्त्यावरील सुमारे ५० टक्के दिवे बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी दिव्यांचे पोलही नसल्याने रात्रीच्या वेळी हा परिसर अंधारात राहतो. कशेडी बोगद्याजवळील सेवा रस्त्यावर तर आवश्यक त्या ठिकाणी पथदिव्यांची उभारणीच झालेली नसल्याचे सांगण्यात येते.

देखभालीची जबाबदारी कोणाची?
कशेडी बोगद्याचे बांधकाम ज्या कंपनीमार्फत करण्यात आले, त्याच कंपनीकडे सध्या देखभालीचे काम असल्याची माहिती आहे. प्रकाशव्यवस्था आणि पथदिवे बंद असण्याबाबत कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रकाशयोजना आणि देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीची मागणी
गौरी-गणपतीच्या सणाच्या काळात वाहनांची व नागरिकांची वर्दळ वाढलेली असताना मार्गावरील प्रकाशव्यवस्था सुरळीत असणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने कशेडी बोगदा आणि लगतच्या महामार्गाची पाहणी करून बंद दिवे तातडीने सुरू करावेत. तसेच आवश्यक ठिकाणी नवीन पोल उभारून प्रकाशाची पुरेशी व्यवस्था करावी, अशी मागणी भोगावचे माजी सरपंच राकेश उतेकर यांनी केली आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT