आरोग्यसेवांची पाहणी
एडीबीच्या प्रतिनिधींकडून पनवेलमधील आरोग्य केंद्रांचा आढावा; सुविधांच्या विस्तारासाठी निधी मिळण्याची शक्यता
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सुविधांची आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) वरिष्ठ प्रतिनिधींनी गुरुवारी (ता. १७) पाहणी केली. खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ५, ‘आपला दवाखाना’ तसेच आसूडगाव येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राला प्रतिनिधींनी भेट देऊन तेथील सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. महापालिकेच्या आरोग्यविषयक उपक्रमांचे प्रतिनिधींनी कौतुक केले.
या पाहणी दौऱ्यात एडीबीच्या वरिष्ठ मूल्यांकन तज्ज्ञ युंजी किम, केंद्र शासनाचे प्रतिनिधी, एडीबीचे सल्लागार साईनाथ बॅनर्जी आणि सेजल उमळकर सहभागी झाले होते. राज्यस्तरीय सहाय्यक संचालक डॉ. अपर्णा गांवकर, डॉ. चंदाराणी पाटील आणि डॉ. दीप्ती देशमुख यांचीही उपस्थिती होती.
महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रतिनिधींना देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, बहुविशेषज्ञ दवाखाने, आरोग्य शिबिरे तसेच आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यात आली.
महिला आरोग्य समिती आणि जनआरोग्य समितीच्या अध्यक्षांसह स्थानिक नगरसेवकांशी संवाद साधून प्रतिनिधींनी महापालिकेच्या आरोग्यसेवांबाबत माहिती घेतली. नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
आरोग्य केंद्रांना निधीचे बळ
एडीबीच्या पाहणी दौऱ्याच्या आधारे राज्यातील आरोग्यसेवांच्या विस्तारासाठी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाला निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीमुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण, विस्तार आणि आवश्यक सुविधांमध्ये वाढ करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्यसेवांची क्षमता वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.