सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : अभ्यासासाठी शांत, प्रसन्न आणि पोषक वातावरणाच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात ज्ञानाचे नवे दालन खुले झाले आहे. उथळसर नाका येथील जेव्हीएम एमराल्ड येथे जेव्हीएम चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे संचालित गांधी महेंद्र छत्रभुज एज्युकेशनल ट्रस्ट वाचनालयाचे उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमहापौर कृष्णा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना अभ्यास, वाचन तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र आणि सुविधायुक्त जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे वाचनालय उभारण्यात आले आहे. येथे एकाच वेळी सुमारे ५० विद्यार्थ्यांना बसून अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ध्येयांसाठी समर्पित जागा उपलब्ध झाली आहे. उद्घाटन सोहळ्यास ठाणे आणि परिसरातील विविध सामाजिक सेवा संस्थांचे प्रतिनिधी, मान्यवर आणि नागरिक मिळून सुमारे १०० जण उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या दर्जेदार पायाभूत सुविधा आणि अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयींचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
शिक्षण, वाचन संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणारी ही सुविधा ठाणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राला हातभार लावण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीने सातत्याने केला जात असल्याचे सांगण्यात आले.
शैक्षणिक प्रगतीला चालना
शिक्षण आणि ज्ञानाच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळून त्याचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम समाजावर होऊ शकतो, असे मत नरेश म्हस्के आणि कृष्णा पाटील यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी जेव्हीएम चॅरिटेबल फाउंडेशनचे विश्वस्त जितेंद्र मेहता यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही दोन्ही मान्यवरांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन वाचनालयाची संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.