शहापूर, ता. २१ (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ अभियानाला शहापूर पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे सुरुवात करण्यात आली. गटविकास अधिकारी बाबूराव राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात बिरसा मुंडा कृषीक्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले; तसेच योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत शहापूर तालुक्यातील विविध भागांत हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून पंचायत समितीच्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शेतकरी, दुर्बल घटक आणि आदिवासी पाड्यांतील नागरिकांना त्यांच्या भागात जाऊन योजनांची माहिती देणे, लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे; तसेच पंचायत समिती स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी गुलाबसिंग वसावे, कृषी अधिकारी विलास झुंझारराव, विस्तार अधिकारी बाळकृष्ण वाघचौरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी सहभागी शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या खरेदीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे उपयोजन मोबाईलमध्ये स्थापित करून खताचे आरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. काही शेतकऱ्यांनी उपयोजन मोबाईलमध्ये स्थापित करून प्रत्यक्ष नोंदणी केली.
विविध कार्यक्रम
पंचायत समिती परिसर तसेच ग्रामपंचायत हद्दीत २ ऑक्टोबरला वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तर ६ ऑक्टोबरला ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमांतर्गत बिरसा मुंडा कृषीक्रांती योजनेंतर्गत नवीन सिंचन विहिरींचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. यावेळी सिंचन योजनांची माहितीही देण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी विलास झुंझारराव यांनी सांगितले.
गाव-पाड्यांपर्यंत योजनांचा लाभ
पंचायत समितीचे सर्व अधिकारी तालुक्यातील गावे आणि आदिवासी पाड्यांवर जाऊन सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणार आहेत. शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ गावांतील आणि आदिवासी पाड्यांवरील लाभार्थींना मिळवून देण्याचा प्रयत्न या कालावधीत केला जाणार आहे, असे गटविकास अधिकारी बाबूराव राठोड यांनी सांगितले.
शहापूर : ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देताना गटविकास अधिकारी बाबूराव राठोड आणि अन्य अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.