मालाड रेल्वे पूल कचऱ्याच्या विळख्यात
जिन्यांवर अस्वच्छता, थुंकीचे डाग; नियमित स्वच्छतेअभावी प्रवाशांची गैरसोय
मालाड, ता. २१ (बातमीदार) : मालाड पश्चिमेला पूर्व भागाशी जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, पुलावर सर्वत्र कचरा साचलेला दिसून येत आहे. विशेषतः कांदिवलीच्या दिशेला असलेल्या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जिन्यांची मागील अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली नसल्याची तक्रार पादचाऱ्यांनी केली आहे.
पुलावरील अस्वच्छतेमुळे ‘स्वच्छ रेल, स्वच्छ परिसर’ या रेल्वे प्रशासनाच्या संदेशालाच हरताळ फासला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. कचरा आणि दुर्गंधीमुळे अनेक पादचारी या पुलाचा वापर टाळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुलावर भटके श्वान आणि मांजरे आश्रय घेत असल्याचेही दिसून येते. तसेच गुटखा व पान खाऊन पुलाच्या जिन्यांवर ठिकठिकाणी थुंकण्यात आल्याने जिन्यांना लाल रंगाचे थुंकीचे डाग पडले आहेत. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मालाड रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. अशा महत्त्वाच्या पादचारी पुलाची नियमित साफसफाई आणि देखभाल होणे आवश्यक असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल प्रवासी आणि पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने तातडीने या पादचारी पुलाची स्वच्छता करून नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.