सत्ताधारी भाजपची मनसे पोलखोल करणार
कंत्राटी कामगारांच्या ७,५०० रुपयांच्या पगारवाढीवरून आंदोलन पेटणार!
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सात हजार ५०० रुपयांच्या पगारवाढीचा प्रश्न आता राजकीय पटलावर चांगलाच तापला आहे. महासभेत मंजुरी मिळून दोन महिने उलटले तरी प्रशासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या थेट आंदोलनात्मक इशाऱ्यामुळे अखेर निद्रिस्त झालेले सत्ताधारी भाजप जागे झाले असून, त्यांनी प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, या १५ दिवसांत खात्यात वाढीव पगार जमा न झाल्यास कामगारांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही उघडीप पाडू, असा दम मनसेचे कामगार नेते अप्पासाहेब कोठुळे यांनी दिला आहे.
पालिकेतील शेकडो कंत्राटी कामगारांना दिलासा देण्यासाठी महासभेत ७,५०० रुपयांची भत्ता/पगारवाढ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता, मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि अनास्थेमुळे हा निर्णय केवळ कागदावरच राहिला. यावर तीव्र आक्षेप घेत मनसे नेते संदीप देशपांडे आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी वाशी येथे पत्रकार परिषद घेऊन महापालिका प्रशासनाला एक महिन्याची मुदत दिली होती. यानंतर सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावर अप्पासाहेब कोठुळे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीची आम्ही वाट पाहत आहोत, परंतु प्रशासनाकडून अजूनही हे पैसे नेमके कधी कामगारांच्या खात्यात जमा होणार, या प्रश्नाचे ठाम उत्तर दिले जात नाही. महासभेत केवळ कामगार हिताच्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी न करता कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवायचे, असा खेळ सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.
नगरविकास खात्यावर सडकून टीका
महापालिकेत ठराव मंजूर करून कंत्राटी कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपने केले आहे, असा आरोप करत कोठुळे यांनी नगरविकास खात्यावरही निशाणा साधला. नगरविकास विभागाचा कारभार पाहणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनादेखील या संवेदनशील प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला. महासभेत मंजूर झालेले एकही धोरण प्रत्यक्षात लागू होत नसेल, तर हे सत्ताधारी कंत्राटी कामगारांसह संपूर्ण नवी मुंबईकरांची घोर फसवणूक करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसेने आता या लढ्यासाठी कंबर कसली असून, पोलखोल आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.