माजी पोलिस कर्मचाऱ्याच्या
साथीदाराकडून बिल्डरला धमकी
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव; खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : माजी आमदार नरेंद्र पवार आणि माजी पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाटील यांच्या साथीदाराने कल्याणमधील बिल्डरला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाटील आणि प्रशांत देशमुख यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार बिल्डर रोहित दीक्षित यांनी खडकपाडा पोलिसांकडे केली आहे.
दीक्षित यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (ता. १८) योगेश हराड याने त्यांना व्हॉट्सॲपवरून फोन केला. या वेळी शिवीगाळ करून पाटील आणि देशमुख यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यास सांगण्यात आले. तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप दीक्षित यांनी केला आहे.
या तक्रारीची दखल घेत खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. हराड याने दिलेल्या धमकीमागे पाटील किंवा देशमुख यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, २२ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून पडघा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या कथित सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यात माजी आमदार नरेंद्र पवार आणि माजी पोलिस कर्मचारी शैलेश पाटील आरोपी आहेत. या प्रकरणात पाटील फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पाटील यांच्या विरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्यात लैंगिक अत्याचार, कथित फसवणूक आणि खंडणीसंबंधीच्या प्रकरणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकरणांतील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत असून, ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.