‘पीएमओ’चे बनावट ओळखपत्र; दोघांना जामीन
सकाळ वृत्तसेव
मुंबई, ता. २१ : बीकेसीस्थित एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बंदूक आणि पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) बनावट ओळखपत्र घेऊन बळजबरीने प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोन व्यक्तींना कनिष्ठ न्यायालयाने सोमवारी (ता. २१) जामीन मंजूर केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एस. खेडेकर यांनी मुख्य आरोपी रोहन पारिख आणि त्याचा सहकारी दिलीप कुंडे यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
जिओ वर्ल्ड प्लाझा येथे ७ सप्टेंबरला ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ साठी शेजारीच असलेल्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ला भेट देणार होते, त्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडली. मॉलमध्ये प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांना कुंडेकडे बंदूक असल्याचे आढळल्याने त्यांना अडवण्यात आले. त्यानंतर त्या दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यातील एकाने आपण पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकारी असल्याचा दावा करत एका ओळखपत्र दाखवले होते. पारिख वैयक्तिक कारणास्तव मॉलमध्ये गेला होता आणि त्याला कोणत्याही अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीबद्दल किंवा नव्याने लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, असा युक्तिवाद पारिखकडून वकील सतीश मानेशिंदे यांनी केला. मुळात, हा तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा आहे, कारण यात कोणत्याही व्यक्तीला इजा किंवा हानी पोहोचलेली नाही. पारिख हा विद्यार्थी ते व्यावसायिक अशा स्थित्यंतराच्या टप्प्यावर असून, त्याला दीर्घकाळ कोठडीत ठेवल्यास त्याच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच त्याच्या नुकत्याच सुरू झालेल्या करिअरवरही डाग लागू शकतो, असाही दावा केला. दुसरीकडे, पारिखच्या निवासस्थानाची तपासणी करताना चॅटजीपीटीचा वापर करून तयार केलेली पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित अनेक बनावट कागदपत्रे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.