सुखकर प्रवासाचा विकासरथ
भिवंडी, कल्याण, नवी मुंबईला रिंग मेट्रो जोडणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : वाहतूककोंडी, प्रवासासाठीचा वेळ, शहर विस्ताराच्या पार्श्वभूमीवर रिंग मेट्रो शहरासाठी भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या सुविधेमुळे ठाणेकरांना भिवंडी, कल्याण, नवी मुंबईसह मुंबईला जाता येणार असल्याने रिंगमेट्रो सुखकर प्रवासाचा विकासरथ ठरणार आहे.
ठाणे शहराची वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रिंग मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहराच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असला, तरी प्रस्तावित मार्गाबद्दल असलेले समज गैरसमजांमुळे महामेट्रोने जनजागृती, संवादाची प्रक्रियाही सुरू केली आहे. या प्रकल्पाने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. शिवाय इतर मेट्रो मार्गिकांशी जोडणीनंतर मुंबई, भिवंडी, कल्याणपर्यंतचा प्रवास सोईस्कर होणार आहे.
--------------------------
रिंग मेट्रोची रचना
प्रकल्प मंजुरी - सप्टेंबर २०२४
खर्च - १२ हजार २०० कोटी
एकूण लांबी - २९
उन्नत मार्ग - २६ किलोमीटर
भूमिगत मार्ग - तीन किलोमीटर
---------------------
एकूण स्थानके - २२
उन्नत - २०
भूमिगत - २
-------------------------
सार्वजनिक वाहतुकीला बळ
- ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये मंजुरी दिली. या अंतर्गत प्रमुख निवासी, व्यापारी रोजगाराच्या केंद्रांना मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याचा उद्देश आहे.
- अंतर्गत प्रवासासाठी स्वतंत्र मेट्रो जाळे उपलब्ध होणार आहे. रिंग मेट्रोची मार्गिका ४, ५ शी होणारी जोडणी ही ठाणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
-----------------------
नोकरदार, विद्यार्थ्यांना दिलासा
कापूरबावडी-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ शी रिंग मेट्रो जोडली जाणार आहे. बाळकुम परिसरातील रिंग मेट्रो स्थानकाची मार्गिका ५ शी जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे शहरातून पुढे मेट्रोतून भिवंडी, कल्याणच्या दिशेने प्रवास करता येणार आहे. यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा अन्य कामांसाठी दररोज प्रवास करणाऱ्यांना रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.
...................................
असा झाला रिंग मेट्रोचा प्रवास
ठाणे शहरासाठी रिंग रेल्वेची संकल्पना तब्बल चार दशकांपूर्वी मांडण्यात आली होती. १९८८ मध्ये रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस (राइट्स) संस्थेने रिंग रेल्वेबाबत अभ्यास केला. त्यानंतर शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या, बदलत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन संकल्पनेत वेळोवेळी बदल झाले. रिंग रेल्वेनंतर लाईट रेल, ट्राम, आता रिंग मेट्रो असा प्रकल्पाचा प्रवास झाला आहे.
..............................
मेट्रोची वैशिष्ट्ये
- सहा डब्यांची गाडी
- प्रत्येक डब्यात ३०० प्रवासी
- प्रकल्पासाठी ४० रेकची व्यवस्था
........................
२०२९ मध्ये पहिला टप्पा
रिंग मेट्रोचा पहिला टप्पा २०२९ मध्ये डोंगरीपाडा ते पातलीपाडा मार्गावर सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण रिंग विकसित केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे शहरातील विविध मेट्रो मार्ग एकमेकांना जोडले जाऊन सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.