सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या चेंदणी कोळीवाडा येथील रेल्वे भुयारी मार्गातील पाण्याचा प्रश्न आता केवळ पंप लावून उपसण्यापुरता मर्यादित न ठेवता त्याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पावसाळ्यात आणि अमावस्या-पौर्णिमेच्या भरतीदरम्यान भुयारी मार्गात वारंवार पाणी साचत असल्याच्या तक्रारींची दखल घेत रेल्वे आणि महापालिकेसह संबंधित यंत्रणांना संयुक्त तांत्रिक पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक, ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे तहसीलदारांना पत्र पाठविले आहे. जलभरावाबाबत संबंधित यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अनुपालन अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे. चेंदणीच्या भुयारी मार्गात पाणी नेमके कोणत्या मार्गाने येते, याचा अभ्यास आता केला जाणार आहे. पावसाचे पाणी, नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि समुद्राच्या भरतीचा परिणाम यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पाणी साचल्यानंतर पंप लावून बाहेर काढणे हा तात्पुरता उपाय आहे. मात्र, पावसाळ्यात आणि भरतीच्या काळात जलभराव होत असल्याने कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याची मागणी होत होती. गावठाण, कोळीवाडे, पाडे संवर्धन समितीने यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत भुयारी मार्गात तात्पुरती पंपिंग यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पाणी साचल्यास बॅरिकेडिंग, सूचना फलक आणि वाहतुकीसाठी आवश्यक पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
उपाययोजनांचे नियोजन
सध्याच्या ड्रेनेज व्यवस्थेची क्षमता, पर्जन्यजल निचरा आणि रेल्वे पुलाखालील संरचनेची तांत्रिक स्थिती तपासली जाणार आहे. जलभरावाचा स्रोत निश्चित झाल्यानंतर त्यावर अभियांत्रिकी उपाययोजना निश्चित करण्याचे नियोजन आहे. त्यात मोठ्या क्षमतेची पंपिंग व्यवस्था, पंपिंग स्टेशन, ड्रेनेजची क्षमता वाढविणे आणि भरतीचे पाणी उलट दिशेने भुयारी मार्गात येऊ नये यासाठी फ्लॅप गेट किंवा चेक व्हॉल्व्ह बसविण्याच्या पर्यायांचा विचार केला जाणार आहे.
भरतीच्या वेळी धोक्याची पूर्वसूचना
अमावस्या आणि पौर्णिमेच्या काळात भरती वाढल्याने भुयारी मार्गातील जलभरावाचा धोका वाढतो. त्यामुळे अतिवृष्टी किंवा भरतीच्या काळात नागरिकांना वेळेवर सूचना मिळाव्यात, यासाठी पूर्वसूचना यंत्रणा उभारण्याबाबतही प्रशासनाने निर्देश दिले आहेत. सूचना फलकांसह प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देण्याची व्यवस्था करण्याचेही सुचविले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
भुयारी मार्गात पाणी साचल्याने पादचारी, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. पाण्याची पातळी वाढल्यास वाहतुकीवरही परिणाम होतो. त्यामुळे या मार्गाचा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशीही संबंधित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.