भिवंडी, ता. २ (बातमीदार) : भिवंडी निजामपूर शहर महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पालिकेतील सर्व कर्मचारी संघटना एकत्र आल्या आहेत. ‘कामगार एकीकरण महासंघर्ष पालिका भिवंडी युनियन युनिट’च्या माध्यमातून या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच महापालिका आयुक्त अनमोल सागर यांची भेट घेणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
दिवाळीपूर्वी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर सहावा आणि सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देणे, २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील (एनपीएस) रकमेबाबत चर्चा करणे, तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या उलट तपासणी व तपासणीच्या प्रश्नावर आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली आहे. दीर्घकाळापासून निलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत संघटना पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी, तसेच महापालिकेच्या आस्थापनेवरील २९५ कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत सामावून घ्यावे, अशीही मागणी आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयातून किमान तीन महिन्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पदनियुक्त्या कराव्यात!
आरोग्य विभागातील सहाय्यक आयुक्तपदावर आरोग्य निरीक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि किमान २० वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच सेवाज्येष्ठतेनुसार भाग अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, बिट निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांसह अन्य विभागांतील पदांवर नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.